नाशिक : नाशिक जिल्ह्यातील तळेगाव दिंडोरी गावातील शेतात जखमी अवस्थेत आढळलेल्या फ्लेमिंगोवर यशस्वी उपचार करत त्याला वाचविण्यात यश आले आहे. तसेच त्याला सुखरूपपणे अधिवासात सोडण्यात आले.


दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील सागर ढाकणे यांच्या शेतात फ्लेम‌िंगो पक्षी जखमी अवस्थेत सापडला. ढाकणे हे शस्त कामासाठी गेले असता त्यांना गडद गुलाबी वर्णाचा, साधारणपणे तीन फूट उंचीचा हा पक्षी दिसला. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात फ्लेमिंगो पक्ष्याच्या पंखाला इजा झाली. पंखाला इजा झाल्याने तो उडू शकत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणून त्यांनी नाशिकच्या इको एको या पक्षीमित्र संस्थेला संपर्क साधला.


इको एको संस्थेच्या पक्षी मित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच वनविभागासही याबाबत कळविण्यात आले. यावेळी फ्लेमिंगोस वनपाल, वनरक्षक यांनी जाऊन या पक्षास ताब्यात घेत प्रथमोपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविले.


नाशिक येथे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पवार, सचिन वेंदे यांचे मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. त्यांनतर इको इको फाउंडेशनचे अभिजीत महाले यांनी वनविभागाच्या तात्पुरत्या निवारा केंद्रात त्यावर निगराणी ठेवली. दोन दिवसात त्याच्या जखमा बरे होऊन त्यास वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी प्रादेशिक श्रीमती जोशी मॅडम, वनपाल उमराले, वनरक्षक राशेगांव, उमराळे, निगडोल, वनसेवक तसेच इको इकोचे अभिजीत महाले, सागर पवार यांनी यशस्वीरित्या वाघाड धरणाच्या बॅक वॉटर मध्ये नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.


'फ्लेम‌िंगो'चा अधिवास
फ्लेमिंगो हा पक्षी आफ्रिका व गुजरातमधील कच्छच्या रणातून आपल्याकडे स्थलांतर करून येतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षी जखमी आढळल्यास प्राथमिक उपचार करून त्यांना परत त्याच्या अधिवासात मुक्त केले जाते. परंतु हा पक्षी आकाराने मोठा असल्याने व पंख तुटला म्हणून संस्थेने त्यास नाशिक येथील पशु संवर्धन यांच्याकडे उपचारासाठी नेण्याचे ठरविले. यानुसार त्याच्यावर उपचार करण्यात येऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


नाशिकमध्ये पक्षी उपचार केंद्र
जिल्ह्यात वनक्षेत्र मोठे असून वन्यप्राण्यांची संख्याही खूपच आहे. विविध घटनांत ते जखमी होतात, तेव्हा उपचारासाठी जनावरांचे स्थानिक दवाखाने किंवा शासकीय पशुचिकित्सालयात न्यावे लागते. अनेकदा प्राणीप्रेमीच उपचार करुन त्यांना जंगलात नेऊन सोडतात. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी या पक्षी उपचार केंद्रास मंजुरी मिळाली. लवकरच हे पक्षी उपचार केंद्र अस्तित्वात येणार असून याचे कामही प्रगतीपथावर आहे.