मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणे यांनी टीका केली आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीने स्वतःची प्रतिष्ठा राखली, त्याचा काल अभाव जाणवला. निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, अशी टीका नारायण राणेंनी केली. कालच्या भाषणात एकाही विकास कामाचा उल्लेख नाही, कोरोनाचा उल्लेख नाही. जवळपास 43 हजार रुग्ण महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडले. याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येत नाही का? असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही. पंतप्रधानांच्या कामावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. राज्यात 16 हजार कोटींचे उद्योग आणल्याचा उल्लेख केला तो फक्त कागदावर आहे, बेकारीचा उल्लेखच नाही, असं नारायण राणेंनी म्हटलं.


बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं


हिंदुत्वावर बोलण्याचा यांना बोलण्याचा अधिकार आणि नैतिकता नाही. यांचे 56 आमदार नरेंद्र मोदींच्या नावावर आलेत, नाहीतर 25 पण आले नसते. बेईमानी करून, हिंदुत्वाला मूठ माती देऊन त्यांनी पद मिळवलं असा माझा आरोप आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली.


मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पुत्राला क्लीन चिट दिलीय


मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पुत्राला क्लीन चिट दिलीय, पण आजही म्हणतो सुशांत सिंग राजपूतचा खून झाला आहे. त्यातील आरोपी गजाआड जातील, त्यात एक मंत्री, त्यांचा मुलगा पण असेल. सीबीआयने अजून केस बंद केलेली नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं.


शिवसेनेला सत्तेत आणून बसवलं कारण आम्ही वाघ होतो


उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या जीवावर एकही काम आजपर्यंत पूर्ण केलेलं नाही. आम्ही वाघ आहोत म्हणे, कोणी सांगितलं वाघ आहे. पिंजऱ्यातला वाघ आहे की बाहेरचा ते पण स्पष्ट करा. शिवसेनेला सत्तेत आणून बसवलं कारण आम्ही वाघ होतो, बेडूक म्हणून नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस. आमच्यावर बोललात तर याद राखा, 39 वर्षात जे काही पाहिलं ते सर्व बाहेर काढेन, असा इशाराही नारायण राणेंनी दिला.


मराठ्यांना आरक्षण हा माणूस देऊ शकत नाही. मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस आहे. मनगटात ताकद आहे म्हणून आम्ही आरक्षण दिलं. संजय राऊत म्हणताच सरकार 5 वर्षे पूर्ण करणार, यांचे 56 आमदार आणि पुन्हा बोलतात आमचं सरकार पाडा. इथं शिवसेनेच्या आमदारांची कामं होत नाहीत, त्यांच्यात असंतोष आहे, पुढच्या वेळी 15 आमदार येणार नाहीत, असं भाकीतही नारायण राणेंनी केलं.


Shivsena Dussehra Melava : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान