मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुढी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.


भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दर्शवला आहे. हीच खेळी त्यांनी महाराष्ट्रात केली होती. एकीकडे पाठिंबा दाखवायचा आणि छुप्या मार्गाने दगा करायचा. मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलोय. महाराष्ट्रातही हाच डाव होता, मात्र शिवसेनेनं हा डाव हाणून पाडला, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.


देशात कोरोनाचं संकट असताना त्यांना राजकारण सूचतंय. निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये मोफत कोरोनाची लस देण्याची घोषणा करता. मग उर्वरित भारत काय बांगलादेश आहे का? त्यांच्याकडून पैसे घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.


नुसत्या काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्या


हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केलेल्या भाषणाची आठवण करुन देत उद्धव ठाकरे म्हणाले की, मोहन भागवत यांना मानणाऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या हिंदुत्वाचा अर्थ समजून घ्यावा. नुसत्या काळ्या टोप्या घालू नका. त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्यावं. घंटा वाजवा, थाळ्या वाजवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शिवसेनाप्रमुख यांचे हिंदुत्व आणि तुमचे हिंदुत्व यात फरक आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. इथं गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता, हे कसले हिंदुत्व असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.


नारायण राणेंची बेडकाशी तुलना


आजचा शिवसेनाचा दसरा मेळावा कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही. पण काही जणांना इंजेक्शन देने गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला, त्यांनी बाबांना सांगितलं, असा टोला उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांना लगावला. आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल.


उद्धव ठाकरे भाषणाचे LIVE UPDATE




  • आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून बोलतोय

  • हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा

  • आम्ही तुमच्यासारखे ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीत

  • महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर गुढीपाडवा साजरा करेन