नंदुरबार : एकीकडे राज्य सरकारने आज राज्यातील बारा जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली. त्यानुसार अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले तर अनेकांना सोन्याहून पिवळे झाल्याचे वाटत आहे. दुसरीकडे अजितदादांनी शेवटी एंट्री करूनही पुण्यावर ताबा मिळवला. शिवाय सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद बहाल केले. नंदुरबारमध्ये (Nandurbar) गेल्या दोन पंचवार्षिक भाजपचा पालकमंत्री असताना आता मात्र अमळनेरच्या आमदार अनिल पाटील यांच्यावर नंदुरबारच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने एकप्रकारे राष्ट्रवादीने भाजपवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. 


राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून शिंदे फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चूल मांडली. स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांची मंत्रिपदावर वर्णी लावली. यामुळे तेव्हापासूनच शिंदे गटाची धाकधूक वाढल्याचे चित्र होते. त्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटत नव्हता. दुसरीकडे काल दिवसभर अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आज राज्य सरकारने बारा जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली, यातही राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसून आल्याने शिंदे गटासह भाजपच्या गोटात खळबळ उडाली. विशेष म्हणजे ज्या नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन पंचवार्षिक भाजपचा (BJP) पालकमंत्री असताना दादांनी तिथंही आपला पत्ता गिरवल्याचे जाहीर यादीतून समोर आले आहे. 


गेल्या दोन पंचवार्षिक पासून नंदुरबार जिल्ह्यात भाजपकडे पालकमंत्री पद होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जयकुमार रावल (Jaykumar Rawal) हे पालकमंत्री पदी होते. त्यानंतर स्थानिक परिसराची जण असलेले आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचं नेतृत्व नंदुरबार जिल्ह्यात काम करत होते. मात्र भाजप नेतृत्वाला राष्ट्रवादीने खिंडार पाडले असून आता नंदुरबार राष्ट्रवादीचा (NCP) दबदबा पाहायला मिळणार आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस आपणच बॉस असल्याचे सांगत असताना दुसरीकडे अजित दादांनी आपल्या शैलीत भाजपवर कुरघोडी केली आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार मंत्री अनिल पाटील हे नंदुरबार जिल्ह्याची धुरा सांभाळणार असून पहिल्यांदा त्यांची पालकमंत्री पदी वर्णी लागल्याने मंत्रिपदासह पालकमंत्रीपदाची जणू त्यांना लॉटरीच लागल्याचे बोलले जात आहे. 


कोण आहेत अनिल पाटील? 


राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार अनिल पाटील यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. मंत्री झाल्यावर प्रथमच त्यांना पालकमंत्रिपद मिळाले आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य होते. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाने त्यांना अमळनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले व प्रथमच आमदार झाले. जिल्ह्यात त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकमेव विधानसभा जिंकता आली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ते एकमेव आमदार होते. अजिदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तेही त्यांच्या सोबत पक्ष सोडून बाहेर पडले आहेत. त्यांना राज्यांचे मदत व पुनर्वसन हे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. प्रथमच आमदार आणि मंत्रिपद असा लाभ त्यांना झाला. त्यांना पालकमंत्रिपद कुठले मिळणार याची प्रतीक्षा होती.


इतर महत्वाची बातमी : 


Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद, पण मंत्री छगन भुजबळांना स्थान नाही, नेमक घोडं अडलं कुठं?