नंदुरबार : गुजरातच्या सीमेलगत असलेल्या नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यातील खोकसा आणि मोठा कडवण परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवत आहेत तर भूगर्भातूनही आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास मोठा कळवण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून याची नोंद गांधीनगर येथील भूकंपमापन केंद्रात झाली आहे. मोठा कडवण परिसरात 2.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता असल्याची नोंद झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून तालुक्यातील या परिसरात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिक उघड्यावर रात्र काढत आहेत. या भागात भूगर्भ शास्त्र विभागाचे अधिकारी दाखल झाले असून आवाजाचे गूढही शोधले जात आहे.
नागरिक भीतीमुळे उघड्यावर काढताय रात्र
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खोकसा, कोटखांब, कामोद, नागझरी, सरी, बोरझर, करंजी बु आदी गावांमध्ये जंगलातून मोठे आवाज येत असल्याने या भागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहे. रात्री अनेक ग्रामस्थ आपले लहान लेकरांसह घरात न थांबता रस्त्यावर बसत आहेत. खोकसा गावातील अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी बुधवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाहेरच थांबलेले दिसून आले. काल रात्री कंपाचा आवाज वाढल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक संस्थाचालक भयभीत झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवण्यात आले. यानंतर आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकाश वसावे, विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
गोवाल पाडवींची घटनास्थळी भेट
दरम्यान, भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील खोकसा व लगतच्या गावांना काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी, माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, तहसीलदार दत्तात्रय जाधव आदींनी गावात जाऊन पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
ठोस उपाययोजना करणार : गोवाल पाडवी
खोकसा परिसरामध्ये नेमका आवाज कसला येतो यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील मेरी येथील तज्ञांची टीम सोमवारी बोलून तपासणी केली जाईल. जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर पथकाला नेमका आवाज कसला येतोय, याची माहिती घेण्याची मागणी ग्रामस्थांनी खासदार-आमदार यांच्याकडे केली. खासदार गोवाल पाडवी यांनी ग्रामस्थांच्या तक्रारीच्या नोंदी घेतल्या असून तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तर माजी मंत्री व आमदार के सी पाडवी यांनी नागरिकांना घाबरू नये, याबाबत उपाययोजना केल्या जातील, असे म्हटले आहे.
आणखी वाचा