नांदेड : सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेने कुटुंबासह गेल्या दोन वर्षापासून घर सोडले. आता त्याने किडन्या (Kidney) विकणार असल्याचे बॅनर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावले.  नांदेडमध्ये (Nanded News) सध्या एका विचित्र बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सावकारी कर्ज फेडण्यासाठी एका महिलेने चक्क पाच किडनी विकणे आहे, असे पोस्टर लावले आहे.


नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच भिंतीवर हे पोस्टर लावण्यात आले आहे. खासगी सावकाराच्या दहशतीने या महिलेने आपल्या कुटुंबियासह गेल्या दोन वर्षांपासून घर सोडले होते. तेव्हापासून हे कुटुंब वणवण भटकत आहे. त्यांनी लावलेले पोस्टर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून चर्चेचा विषय ठरले आहे.


जिल्हातील मुदखेड तालुक्यातील वाईवरदड येथील महिला शेतकरी सत्यभामा बालाजी कुंचलवार यांनी हे पोस्टर लावले आहे. त्यांच्या कुटुंबात पती, दोन मुले व एक मुलगी, असे त्यांच्यासह पाच सदस्य आहेत. मोठा मुलगा दहावी, दुसरा मुलगा सातवी तर, मुलगी पाचवी पर्यंत शिकले आहेत. वाईवरदड येथे त्यांची सात एकर शेती आहे. मागील तीन वर्षापूर्वी त्यांनी मुदखेडच्या खासगी सावकाराकडून दोन लाख रूपये कर्ज घेतले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी काही पैसे फेडले होते. परंतु, कोरोनातील लॉकडाऊन काळात सर्वच ठप्प होते. त्यातच शेतीतूनही फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड त्या करू शकल्या नाहीत, असे सत्यभामा यांनी सांगितले.


जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली इच्छा मरणाची परवानगी


काही वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील रहिवासी सत्यभामा चंचुलवाड यांचे पती बालाजी चंचुलवाड यांना साप चावला होता.त्याच्या उपचारासाठी सत्यभामा यांनी स्थानिक सावकाराकडून व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. नंतर तिने अनेकवेळा पैसे फेडले.परंतु व्याजाच्या पैशासाठी सावकारांनी पतीला बेदम मारहाण केली.त्याचवेळी सत्यभामा यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी सृष्टी यांनी 3 जुलै रोजी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून 2021 आणि सावकारावर कारवाई करा किंवा त्याला इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी केली, त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही.


सावकाराच्या भीतीमुळे गाव सोडले


सावकारचे पैसे देणे आमचे काम आहे. मरण्यापेक्षा एक किडनी विकून व एका किडनीवर जगू. माझ्या मुलांना शिकवायचे आहे. कुटुंबात पाच जण आहे. त्यापैकी ज्यांची किडनी रुग्णाला फिट बसेल ती विकायची आहे. त्या पैशातून सावकाराचे पैसे द्यायचे आहेत. मी, नांदेडला येणार आहे आणि सर्व सविस्तरपणे सांगणार आहे. मला तुम्ही मदत करा. सावकाराच्या भीतीमुळे गाव सोडले असून जीव मुठीत धरून रहात आहे, असे सत्यभामा बालाजी कुंचलवार यांनी सांगितले.