Nanded Rain : नांदेड (Nanded) जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान सततच्या होणाऱ्या जोरदार पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटू लागले आहेत. तर सुरुवातीला अवकाळी, अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही सरकारनं मदत दिली नाही. हदगाव तालुक्यातील मनाठा, भाटेगाव परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. या परतीच्या धुव्वाधार पावसामुळं सोयाबीनसह,उडीद, मूग ही पिकं पाण्याखाली गेली आहेत.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसानं नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. तर दिवाळीच्या तोंडावर जिल्हाभरात सोयाबीन काढणीला वेग आला असताना परतीच्या पावसाच्या जोराने सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर या पावसामुळं उरल्या-सुरल्या सोयाबीनची काढणीही करता येत नाही. त्यामुळं सोयाबीनच्या पिकात पाणी साचून सोयाबीनला कोंब फुटले आहेत. त्यात आता काही दिवस पावसाचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दररोजच्या या पावसामुळं शेतकऱ्यांसह सामान्यांच्याही आता नाकी नऊ आले आहेत. तर गेल्या आठ दिवसापासून चालू असलेल्या पावसाच्या सततच्या पावसामुळं शेतात मात्र पाणीच पाणी झालं आहे. दरम्यान अतिवृष्टी ,अवकाळी ,परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या बळीराजाने सरकारकडे मदतीची हाक दिली आहे.
वर्धा जिल्ह्यातही सोयाबीन आणि कापूस पिकाला फटका
वर्धा (Wardha) जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. देवळी तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं सोयाबीनसह (soybean) कापूस (cotton) पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतात पाणी साचल्यानं बाकीची पिकं देखील खराब होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. त्यामुळं दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. वर्धा जिल्ह्यात जवळजवळ आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. देवळी तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळं गेल्या तीन दिवस झालेल्या परतीच्या पावसानं पुन्हा सोयाबीन कापणी तसेच मळणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळं नुकताच अतिवृष्टीतून सावरत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट
आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आधीच पावसानं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: