Rain News : सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यात परतीच्या पावसानं भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या पावसानं टोमॅटो शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाने टोमॅटोचे प्लॉट कोलमडले आहेत, त्यामुळं टोमॅटो फुटून पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे नांदेडमध्ये (Nanded) देखील पावसाची रिपरिप सुरु असून, तिथे  सोयाबीनला कोंब फुटले आहे. सोयाबीन उत्पादकांचे मोठं नुकसान झालं आहे.


वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यात परतीच्या पावसाचा फटका


सांगली जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसाने भाजीपाला उत्पादक संकटात सापडला आहे. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो शेतीचं मोठं नुकसान झाले असून, या मोठ्या नुकसानामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसानं टोमॅटोचे प्लॉट कोलमडले आहेत. तर कुठे टोमॅटो फुटून नुकसान झाले आहे. यामुळं जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटो प्लॉटवर मोठा खर्च केला आहे. या प्लॉटचे नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यासह अन्य तालुक्यात परतीच्या पावसानं हजेरी लावल्यानं भाजीपाला उत्पादक संकटात सापडला आहे. भाजीपाला पिकात पाणी साठल्यानं पिक कुजून जाण्याच्या अवस्थेत असून, भाजीपाला उत्पादक पुरता संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. टोमॅटोची बाग कोलमडल्यानं कच्चा टोमॅटो तुटून सरीत पडल्यानं नुकसान झालं आहे. शासनाकडून याचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.




नांदेडमध्ये पावसाची रिपरिप, सोयाबीनला फुटले कोंब


नांदेड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. दिवाळीच्या तोंडावर जिल्हाभरात सोयाबीन काढणीला वेग येतो. परंतू पावसामुळे उरल्या सुरल्या सोयाबीनची काढणीही करता येत नाही. त्यामुळं जागेवरच सोयाबीनला कोंब फुटत आहेत. त्यात आता काही दिवस पावसाचे असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दररोजच्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांच्याही आता नाकी नऊ आले आहेत. तर गेल्या आठ दिवसापासून चालू असलेल्या पावसाच्या सतत च्या पावसामुळे शेतात व शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. 




पालघर जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा भात पिकाला फटका


पालघर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसामुळं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्रावर असलेली भातशेती या परतीच्या पावसामुळं संकटात सापडली आहे. तयार झालेल्या भात पिकाला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. त्यामुळं येथील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडलाय. तयार झालेली भात पिकं शेतातच असून ऐन भात पिकं काढण्याच्या वेळेसच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतो की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहेत. 




महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात 'यलो अलर्ट'