नांदेड : लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलेले भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि काँग्रेसचे निवनियुक्त खासदार वसंतराव चव्हाण(Vasant Chavan) यांच्यामध्ये मानापमान नाट्य घटल्याचं समोर आलं. महापालिकेल्या अभ्यासिकेच्या उद्धाटनाच्यावेळी या दोन खासदारांमध्ये हे नाट्य घडलं. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वसंतराव चव्हाण यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. लोकप्रतिनिधी असूनही आपल्याला डावलण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची प्रशासनाकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


कार्यक्रमपत्रिकेवरून काँग्रेसच्या खासदाराचं नाव वगळलं


स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने सुसज्ज अशी अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. मात्र या कार्यक्रम पत्रिकेवर सुरुवातीला खासदार वसंतराव चव्हाण यांचे नाव नव्हतं. त्यावर वसंतराव चव्हाण यांनी आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार सर्व लोकप्रतिनिधींची नावे घेण्यात आली आणि त्यानंतर महानगरपालिकेने पुन्हा पत्रिका काढली. 


प्रत्यक्ष अभ्यासिकेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासमोर खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'वसंतराव चव्हाण आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. वसंतराव चव्हाण यांनी अभ्यासिकेचे उद्घाटन करून कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. महानगरपालिका प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे असा आरोप खासदार वसंतराव चव्हाण यांनी केला.


नांदेडमध्ये काँग्रेसचा मोठा विजय


अशोक चव्हांनी ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला रामराम केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली. 


अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश दिला. 


ही बातमी वाचा: