Nanded Rainfall Update : ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात पावसाने (Rain) दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले होते. मात्र, वीस दिवसांच्या खंडानंतर नांदेड जिल्ह्यात अखेर पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून सुरु झालेला पाऊस शनिवारी देखील काही ठिकाणी पाहायला मिळाला. ज्यात, किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्ट झाली असून, परिसरात अनेक नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 


जून महिना कोरडा गेल्यावर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणी देखील जोरात झाली. मात्र, पुढे पावसाने दडी मारल्याने पिकं धोक्यात आली. जुलै महिन्याचे शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिना आतापर्यंत पूर्णपणे कोरडा गेला. त्यामुळे पावसाचा जवळपास 20 दिवसांचा खंड पडला होता. अशा परिस्थितीत खरीपाचे पिके धोक्यात आली होती. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. अशातच शुक्रवारी नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले. जिल्ह्यात 24 तासांमध्ये सरासरी 32 मिलिमीटरपावसाची नोंद झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, शनिवारी देखील जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु होती. 


सरासरीच्या तुलनेत 69 टक्के पाऊस


नांदेड जिल्ह्यात 24 तासांमध्ये सरासरी 32 मिलिमीटर पाऊस झाला. किनवट तालुक्यात सर्वाधिक 65.30 मिलिमीटर, हदगाव आणि भोकर तालुक्यांमध्ये प्रत्येकी 51 मिलिमीटर, माहूर तालुक्यात 54, धर्माबाद 43.20, बिलोली 34.30, अर्धापूर 33.10, उमरी 29.60, मुदखेड 23.50, देगलूर 22.60, मुखेड 15.50, नांदेड 20.60, कंधार 11.10 आणि लोहा तालुक्यामध्ये 13.40 मिलिमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 69  टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.


'या' भागात जोरदार पाऊस...


नांदेड किनवट तालुक्यामध्ये एकूण सहा मंडळ आहेत. या सहाही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. बोधडी मंडळात सर्वाधिक 101.30 मिलिमीटर पाऊस झाला, किनवट मंडळात 81.30, सिंदगी मंडळात 69.80, इस्लापूर 66.80, शिवणी 65.80 आणि जलधारा मंडळामध्ये 65.30 मीमी पाऊस झाला आहे.


जोरदार पावसाची अपेक्षा कायम... 


तब्बल 20 दिवसांनी नांदेड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, असे असले तरीही अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा कायम आहे. कारण विहिरींनी तळ गाठले आहेत, बोअरवेलचे पाणी आटले आहेत. अशातच जमिनीची पाणीपातळी मोठ्याप्रमाणात घटली आहे. त्यामुळे जोपर्यंत जोरदार पाऊस होणार नाही, तोपर्यंत विहिरी आणि बोअरवेलचे पाणी वाढणार नाही. त्यामुळे आणखी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Rain : मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज