Nanded Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नांदेड (Nanded) जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. तर काल रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे नद्या नाल्यांना पुर आले आहे. तर काही गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अशा सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, गरज असलेल्या ठिकाणी बचाव पथकाच्या मदतीने मदत केली जात आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून देखील नांदेड जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेतला जात आहे. तर नांदेड जिल्ह्यातील उमरी, अर्धापूर आणि इतरही भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून, मोठ्या संख्येने नागरिक तुंबलेल्या पाण्याचे, पुराचे व्हीडीओ पाठवत असल्याची माहिती अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्वीट करून दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती कशी आहे?
नांदेड जिल्ह्यात रात्रीपासुन मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 12 तासात जिल्ह्यात 230 मीलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुखेड, बिलोली, धर्माबाद देगलुर तालुक्यात अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. या तालुक्यांमध्ये अनेक नदी नाल्याना पूर आला आहे. तर काही गावात मोठ्याप्रमाणात पाणी साचून नुकसान झाल्याचे चित्र आहे. तर पाणी साचलेल्या गावात स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असुन, ठीकठीकाणी प्रशासनाकडून मदतकार्य केलं जातं आहे. पूर आलेल्या तसचं पाणी साचलेल्या गावातील लोकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी दिली आहे.
दोघे पाण्यात बुडाले...
नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना देखील पुर आहे. त्यामुळे अनेकजण नदीच्या पाण्यात पोहचण्यासाठी उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरात असलेल्या आसना नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. राहुल रमेश आठवले आणि साई दशरथ चुनुरवार असे पाण्यात बुडालेल्या तरुणांचे नावं आहेत.
मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव फुटला
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात पावसाने थैमान घातलंय, तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव फुटला असून, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील येवती, पाळा आणि तुपदाळ गावाचा संपर्क तुटला असून अनेक घरांसह दुकानात पाणी शिरलं आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यात मोठे नुकसान झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nanded Rainfall Update : नांदेड जिल्ह्यातील 21 मंडळात अतिवृष्टी; सरासरी 56.60 मिमी पावसाची नोंद