Nanded Rainfall Update : गेल्या दोन दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) अक्षरशः जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या नाल्यांना पूर आला आहे. तर अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात पावसाने थैमान घातलंय, तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव फुटला असून, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील येवती, पाळा आणि तुपदाळ गावाचा संपर्क तुटला असून अनेक घरांसह दुकानात पाणी शिरलं आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यात मोठे नुकसान झालं आहे. तर प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपयोजना राबवल्या जात आहे.
नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान आज देखील जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा व ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून, शुक्रवार (21 जुलै) रोजी जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
रेस्क्यू ऑपरेशन करुन मुलांना बाहेर काढले
नांदेड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस होत असताना अशीच काही परिस्थिती बिलोली तालुक्यात पाहायला मिळत आहे. बिलोलीत गेल्या तीन दिवसापासून संततधार पाऊस होत असू, गुरुवारी सुद्धा तब्बल सहा तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सावळी रोडवर असलेल्या नाल्याला पूर आल्याने येथील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलच्या मुलांना जेसीबीने पुरातून बाहेर आणण्यात आले. नागरिकांना ही रात्री उशिरापर्यंत पाण्यातून एका टोकाला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. तर शहराजवळील सावळी रोडवर असलेल्या नाल्याला पूर आल्याने नाला दुधडी भरुन वाहत होता. त्यामुळे नाल्याच्या पलीकडे शहरातील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलमधील जवळपास 500 ते 600 मुले अडकली होती. या मुलांना रेस्क्यू ऑपरेशन करुन जेसीबीने नाला ओलांडून शहराकडे आणण्यात आले.
आजही यलो अलर्ट...
गेल्या तीन-चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता आज देखील जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आज देखील दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: