नांदेड : रस्त्यावरील खड्ड्यांनी नांदेडमधील एका वृत्तनिवेदकाचा बळी घेतलाय.  गौतम महादेव पट्टेबहादूर ( वय, 51 ) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृत्तनिवेदकाचे नाव आहे. एका खड्यामुळे पट्टेबहादूर यांचं कुटुंब उघड्यावर आलंय. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


गौतम  पट्टेबहादूर हे 1994 पासून नांदेड आकाशवाणी येथे वृत्त निवेदक होते. गौतम पट्टेबहादूर  हे पेट्रोल टाकण्यासाठी घरा बाहेर पडले आणि त्यांचा मृतदेहच घरी आला. गौतम हे पेट्रोल टाकण्यासाठी गेले असता नांदेड शहरातील मधूर भोज हॉटेल समोरील रस्त्याच्या खड्डड्यात पडून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी  रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना गौतम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
 
गेल्या अनेक वर्षापासून गौतम यांनी आकाशवाणी आणि सप्तरंग रेडिओवर विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती, फर्माईश, थेट बांधावरून, शेती संवाद, श्रोता संवाद अशा कार्यक्रमांमधून आपल्या धीरगंभीर आवाजाने त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. नैमातिक उद्घोषक व संकलक यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. नैमातिक उद्घोषक आणि संकलक संघटनेचे ते अध्यक्ष होते. प्रमाणित लेखा परीक्षक म्हणूनही ते नांदेडकरांना सुपरिचित होते. सयंमी, मितभाषी, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून असंख्य मित्र जोडणाऱ्या गौतम पठ्ठेबहादूर यांचे अनेक क्षेत्रातील मान्यवरांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. तब्बल 28 वर्ष आपल्या दमदार आवाजाने आणि बहारदार सादरीकरणाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या निवेदक गौतम पठ्ठेबहादूर यांचा आवाज एका खड्डयामुळे कायमचा शांत झालाय. 


माजी मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्हा आणि शहरातील रस्त्यांची दैयनीय अवस्था झालीय. शहरातील तरोडा नाका, भाग्यानगर, आनंदगर, व्हीआयपी रोड, हिंगोली नाका, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती चौकात व शहरभर खड्यांचे साम्राज्य आहे. याच खड्ड्यामुळे पट्टेबहादूर यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान, या प्रकरणी बांधकाम विभाग नांदेडवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केलीय. गौतम यांच्या मृत्यूमुळे बांधकाम विभागावर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 


महत्वाच्या बातम्या


Wardha News : आईच्या कुशीत असणाऱ्या बाळाची चैन चोरली, चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या  


डोंबिवलीत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे दोघे गजाआड, 725 ग्रॅम वजनाची 1 कोटी 60 लाख रुपयांची उलटी जप्त