Wardha News Update : वर्धा शहर बस स्थानक परिसरात धक्कादायक घटना घडलीय. आईच्या खांद्यावर असलेल्या बाळाची सोन्याची चैन तोडून चोरटे पसार झाले. परंतु, पोलिसांनी काही वेळातच  आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अक्षय उर्फ 'फ्रीझ' सुनिल काळे ( वय 20 रा. पारधी बेडा वायफड ह.मु. स्वागत कॉलनी वर्धा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली असून बाळाच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.


बस स्थानक परिसरामध्ये प्रवाशांच्या बॅग मधील दागिने पळविणे, दुचाकी लंपास करणे, तसेच गर्दीच्या ठिकाणाहून चोरीच्या अनेक घटना सामोर येत आहेत. त्यातच नुकतीच वर्धा शहर बस स्थानकावर घडलेल्या या घटनेने भर टाकली आहे.   बाळाच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, अखेर पोलिसांनी तपासाला गती देत या आरोपीला अटक केली आहे.  


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणाली केतन महल्ले (रा. किन्ही ता. सेलू जि. वर्धा)  या आपल्या 18 महिन्याच्या मुलीला घेवून त्यांच्या आईसह टेकोडा येथे जाण्यासाठी वर्धा बस स्थानकावर आल्या होत्या. बस यायला थोडासा वेळ असल्याने वर्धा बस स्थानकावर बसची प्रतीक्षा करत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या खांद्यावर असलेल्या लहान मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसडा मारून तोडून पसार झाला. त्यानंतर प्रणाली महल्ले यांनी तत्काळ वर्धा शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.  


वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुरेश दुर्गे आणि गुन्हे शोध पथकाचे संजय पंचभाई व त्यांच्या पथकाला प्राप्त झालेल्या माहीतीवरून अक्षय या चोरट्याला कच्ची लाईन वर्धा येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून पळवून नेहल्याली चैन जप्त केली असून अल्पावधीतच गुन्हा उघडकीस आणला आहे. 


"सध्या सणाचे दिवस असल्याने बस स्थानक तसेच बाजारपेठेत गर्दी होत असून गर्दीच्या ठिकाणी जाताना आपले मौल्यवान दागीने, पर्स याबाबत सतर्क राहावे, जेणे करून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, असे आवाहन वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 


ही कार्यवाही प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उप विभागीय पोलीस अधीकारी पियुश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशानुसार, सुरेश दुर्गे व शहर  गुन्हे शोध पथकाचे संजय पंचभाई सुनिल मेंढे, शाम सलामे, सचिन पवार प्रशांत कांबळे, जिवन आडे यांनी केली.