Nanded Water Shortage : नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) बिलोली तालुक्यातील तोरणा गावात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा (Water Supply) योजना बंद असल्याने गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. वीजबिलाची थकबाकी असल्याने तोरणा येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा (Power Supply) खंडित झालेला असून, त्यामुळे गावचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थ आता त्रस्त झाले असून, पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर 27 एप्रिल रोजी पंचायत समितीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा देखील  ग्रामस्थांनी दिला आहे.


वीजबिल थकल्यामुळे पाणीपुरवठा बंद, गावकऱ्यांचे प्रचंड हाल


बिलोली तालुक्यातील तोरणा येथील ग्रामपंचायतच्या कारभाराला ग्रामस्थ कंटाळले आहेत. मागील तीन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाहण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कधी विजेचे रोहित्र बंद असल्याने तर कधी वीजबिल थकल्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा बंद असल्याचे कारण पुढे केले जात आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक गावात उपलब्ध राहत नसल्याने ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे झाला आहे, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. तर तीन महिन्यांपासून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.


गावकऱ्यांचा संताप, 27 एप्रिलपासून घागर मोर्चा काढण्याचा इशारा


गावात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना बंद असल्याने 21 एप्रिल रोजी ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले. ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा तात्काळ सुरु करावा अन्यथा 27 एप्रिलपासून पंचायत समितीवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र अजूनही कोणतेही हालचाली होत नसल्याने गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. आधीच उन्हाळा सुरु असताना त्यात पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे पिण्याचं पाणी देखील विकत घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. 


ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती...


राज्यभरात सध्या उन्हाळ्याचा चटका जाणवत आहे. नांदेड जिल्ह्यात देखील उन्हाचा वाढत आहे. अशातच तोरणा गावात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना बंद आहे. पाणी असून देखील वीज पुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांना पिण्याच पाणी मिळत नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर प्रशासनाने पुढाकार घेऊन तात्काळ पाणीपुरवठा योजना सुरु करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


हेही वाचा


Nanded News : येत्या काळात पाणी टंचाई?; नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक