Nanded News : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरात अनिनो समुद्र प्रवाह सक्रिय झाला आहे. त्याचा आपल्या देशातील मान्सूम हवामान पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेड जिल्हयात (Nanded District) येत्या काळात पाणी टंचाई (Water Shortage) भासू नये यादृष्टीने नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्देश दिले. याबैठकीत विभागनिहाय आढावा घेतांना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना निर्देश केल्या. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, विजवितरण कंपनीचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, नगर पालिका प्रशासन, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.   


उन्हाळ्यात नागरी भागात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा नियंत्रित करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागातही पाणी पुरवठाबाबतचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतला. पाण्याच्या अवैध उपसावर नियंत्रण करुन वेळ पडल्यास टॅकरची व्यवस्था करण्यात यावी. पाण्याचे आराखडे तयार करावेत. तसेच याशिवाय आवश्यकता भासल्यास महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन रोजगार विभागांनी करावे. पिण्याच्या पाण्यासाठी रेन हार्वेस्टिंग, जलयुक्त शिवार, जलसिंचन, अटल भूजल आदी योजना मिशन मोडवर अभियान स्वरुपात राबवाव्यात. जलजीवन मिशनमध्ये जी कामे अपूर्ण आहेत ती जलद गतीने पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला दिल्या. तसेच उन्हाळयात वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाणवठे, जलपात्र उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी वन विभागाला दिल्या. 


प्रत्येक विभागाने दक्षता घेणे आवश्यक 


या बैठकीत जुलै ते ऑगस्ट महिन्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनाचा कृती आराखडा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यातील गोदावरीसह पैनगंगा, आसना, मन्याड, पुर्णा आदी नद्या आणि पाझर तलाव यांची संख्या लक्षात घेता दरवर्षी मान्सूम पूर्व कामाच्या नियोजनात प्रत्येक विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. याचबरोबर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये लहान-मोठे पाझर तलाव यांची संख्याही अधिक आहे. हे तलाव अपेक्षित पर्जन्यमान झाल्यास अधिक सुस्थितीत व सुरक्षित राहण्याच्यादृष्टिने सर्व संबंधित विभागाने अधिक दक्षता घेतली पाहिजे. छोटया नदी नाले यांना थोडया वेळात पूर येतात यावेळी विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक गावात अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन आराखडा 1 मे रोजी ग्रामसभेत मांडण्यात यावा, असे निर्णय झाला आहे. 


आवश्यक तेवढा औषधे पुरवठा ठेवावा...


रस्त्याचे, पुलाचे ऑडीट करुन आपत्तीच्या परिस्थितीत वाहतूक विस्कळीत होणार नाही यांची काळजी घ्यावी असे निर्देश संबंधित विभागाना दिले. पावसाळयात औषधाच्या उपलब्धतेबाबत आरोग्य विभागाने माहिती सादर केली. तसेच आरोग्य विभागाला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास औषधे पुरवठा आवश्यक तेवढा ठेवण्याबाबतच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच विद्युत विज वितरण कंपनीने नागरिकांची गैरसोय होवू नये यांची काळजी घ्यावी.  सर्व तहसिलदार, कृषी अधिकारी यांनी अवर्षण किंवा अतिवृष्टी काळात दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nanded Crime: धक्कादायक! नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरात खंजीर अन् एअर गन; शाळेतच तयार होतायत 'गॅंग'