नांदेड : भगर आमटीच्या भंडारा प्रसादातून सहाशेहुन अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या (Nanded) लोहा तालुक्यातील सावरगाव कोस्टवाडीत समोर आली आहे. यावेळी अख्ख्या गावाला विषबाधा (Poisoning) झाली असल्याची परिस्थिती पाहायला मिळत असून, विषबाधेनंतर गावकऱ्यांना लोहा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मात्र, रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, रुग्णांना नांदेडच्या खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरा झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर सर्वच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


नांदेडच्या लोहा तालुक्यातील सावरगाव कोस्टवाडी इथे भंडारा जेवणातून शेकडो जणांना विषबाधा झाली. त्यापैकी सहाशे रुग्ण नांदेडच्या सरकारी रुग्णालयात पहाटे दाखल झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाने तातडीने या रुग्णावर उपचार सुरू केले असून, विषबाधा ग्रस्त नागरिकांचा आकडा आणखीन वाढत चाललाय. त्यामुळे इतर रुग्णालयात रुग्णांना हलवण्यात आल्याचे अधिष्ठाता यांनी 'एबीपी माझा'ला सांगितले. सावरगाव इथे बाळू मामाची मेंढर आली होती. त्यासाठी रात्री भगर आमटीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसादाच्या सेवणासाठी तब्बल तीन ते चार हजार लोकांचा जमाव जमला होता. प्रसादाच्या सेवनानंतर रात्री उशिरा भाविकांना उलट्या मळमळीचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे या शेकडो विषबाधा ग्रस्त रुग्णांना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, विधबाधा ग्रस्त सर्व रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिल आहे.


परभणीत देखील महाप्रसादातून विषबाधा...


नांदेड प्रमाणे परभणी जिल्ह्यात देखील अशीच घटना समोर आली आहे. परभणी तालुक्यातील सोन्ना गावामध्ये सुरू असलेल्या सप्ताहातील भगरीतून विषबाधा झाल्याने शंभर पेक्षा जास्त गावकऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या सर्व रुग्णांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होत आहे. सोन्ना गावात सध्या धार्मिक सप्ताह सुरू असुन, आज एकादशी असल्याने दुपारी भगर करण्यात आली होती. भगर खाल्ल्यानंतर संध्याकाळी गावातील जवळपास 200 ते 250 लोकांना जुलाब आणि उलटीचा त्रास होत असल्याचे समोर आले. त्यामुळे या लोकांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत असल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nanded News : आम्हाला अटक करा! बँड लावत शेतकरी पोहचले थेट पोलीस ठाण्यात; नेमकं काय घडलं?