Nanded Agriculture News : कापसाच्या उत्पादनात (Cotton Crop) घट झाल्यानं शेतकऱ्यांचे बजेट कोलमडलंय. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, परतीच्या पावसाचा फटका. याचबरोबर करपा, लाल्या, बोंडअळी या रोगामुळं कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाच्या तडाख्यानं कापूस पिकांवरील रोगराई वाढून उत्पन्नापेक्षा लागवड आणि देखभाल खर्चच जास्त झाला आहे. पहिल्याच वेचणीत कापसाच्या पराठ्या झाल्याचं चित्र नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
उत्पादन खर्च निघणेही अवघड
अतिवृष्टीच्या तडाख्यानं कापसावार रोगराई झाली. यामुळं फवारणीचा खर्च वाढला. मात्र, त्यातून अपेक्षीत उत्पन्न न मिळाल्यानं लागवड खर्च निघणेही अवघड झालं आहे. कारण कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, परतीच्या पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे. सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळं शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. त्यातच आता निसर्गाच्या अवकृपेमुळं हाता तोंडाशी आलेला कापसाचा उताराही घटल्यानं पुन्हा एकदा शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रति बॅग दहा क्विंटल उत्पन्न होणाऱ्या कापूस पिकास यावर्षी प्रति बॅग जवळपास एक क्विंटल उत्पन्न निघत असल्यानं कापसाच्या उत्पादनात चांगलीच घट झाली आहे. दरम्यान, काही ठिकाणी शेतकरी विक्रीसाठी कापूस बाजारात आणत आहेत. मात्र, अचानक कापसाचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्या कापसाला सरासरी आठ ते साडेआठ हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कापसाला दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
कापसाच्या उत्पादनात घट झाल्यामुळं पेरणी, मशागत, फवारणीसह इतर खर्चही निघणं अवघड झालं आहे. पहिल्याच वेचणीतच कापसाच्या अक्षरशः पराठ्या झाल्या आहेत. त्यामुळं यावर्षी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यावर्षी आम्हाला कापसाचे पीक परवडले नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मशागत करायचा आमचा मोठा खर्च झाला आहे. मात्र, यातून खूपच कमी उत्पन्न मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळं आमची पूर्णच शेती खरवडून गेली. तर काही ठिकाणी पावसामुळं पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. याचा पिकाला फटका बसल्यानं उत्पादनात मोठी घट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. अशा स्थितीत उरल्या सुरल्या कापसाला दर देखील चांगला नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. महागाचे बियाणे, मशागतीचा खर्च, औषधांसाठी मोठा खर्च कापसावार झाला आहे. मात्र, त्यातून खूप कमी उत्पन्न मिळाल्याचे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
Cotton Price : कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत, 10 हजारांपेक्षा अधिकचा दर मिळावा, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी