Nanded News: नांदेड-नागपूर राष्ट्रीय मार्गावरून रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या बाप-लेकावर काळाने एकाच वेळी घाला (Nanded) घातला आहे. या महामार्गावरुन दुचाकीने जाणाऱ्या बाप-लेकाला समोरुन येत असलेल्या भरधाव आयसर ट्रकने जोरदार धडक (Accident) दिली. या धडकेत या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज 15 मार्चला नांदेड-नागपूर राष्ट्रीय मार्गावर असलेल्या असना पुलावर सकाळच्या सुमारास घडली. यात वडील दाजीबा शंकरराव गाढे ( वय 65 वर्षे ) आणि मुलगा गोपीनाथ दाजीबा गाढे (वय 40 वर्षे )अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस (Nanded Police) करत आहेत.
रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या बाप-लेकावर काळाचा घाला
अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथील दाजीबा शंकरराव गाढे यांचा मोठा मुलगा गोपीनाथ दाजीबा गाढे हे आपल्या वडीलांना वैद्यकीय तपासणीसाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात घेऊन जात होते. दोघेही शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे नांदेड येथे दुचाकीवरून जात होते. दरम्यान, असना पुलावर नांदेड -अर्धापूर मार्गे भरधाव जाणाऱ्या आयसरने ( ट्रक क्रमांक एम.एच.45 ए.ई-8811 ) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर येत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात 65 वर्षीय दाजीबा गाढे हे असना पुलावरून 45 ते 50 फुट उंचीवरून खाली पडले. तर मुलगा गोपीनाथ हा गंभीर जखमी झाला.
ट्रकच्या धडकेत एकाच वेळी दोघांचाही मृत्यू
हा अपघात घडल्यानंतर या महामार्गावर एकच गर्दी झाली. त्यानंतर या अपघाताची माहिती उपस्थित असलेल्या मृत्युंजय दुत गोविंद टेकाळे यांनी महामार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर अपघातस्थळाच्या हद्दीतील विमानतळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. सोबतच, नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जखमींना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील दोघाही कर्त्या पितापूत्राचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याने गाढे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Nagpur Crime News : कौटुंबिक वादातून जावयाची हत्या करणाऱ्या मेहुण्याला अटक; बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
गाडीला कट मारल्याच्या वादातून संगमनेरमध्ये राडा, दोन गट भिडले; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- मित्रांसोबत खेळताना मांजर चावली, काही वेळातच तब्येत बिघडली; 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत