Nanded Crime News : नांदेड पोलिसांच्या (Nanded Police) एका सिनेस्टाईल कारवाईची शहरात जोरदार चर्चा असून, पोलिसांनी प्रसंगावधान बाळगत आरोपीच्या पायावर गोळ्या झाडून त्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तलवार अन् खंजीर घेऊन शहरातील गुरुद्वारा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे कारवाईसाठी आलेल्या पोलिसांच्या दिशेने या आरोपीने सिलिंडर पेटवून सोडून दिले होते. मात्र, प्रसंगावधान बाळगत पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीच्या पायावर गोळ्या झाडून त्यास जखमी करून ताब्यात घेतले. सिंग नानक सिंग गील (वय 40 वर्ष, रा. गुरुद्वारा गेट नं. 5) असे या रेकॉर्डवरील आरोपीचे नाव आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूद्वारा परिसरात एक व्यक्ती हातात तलवार घेऊन फिरत असून, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपी शेरूसिंग याने पोलिसांनाच हल्ला करण्याची धमकी दिली. घरगुती वापराचे सिलिंडर बाहेर काढून त्याने गॅस सोडला व त्यास आग लावण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्याने खिडक्या अन् दरवाजाच्या पडद्याला आग लावली. अशा परिस्थितीत सिलेंडर जवळ असल्याने स्फोट होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी प्रसंगावधान बाळगत गॅस स्फोट होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून,आरोपीच्या पायावर गोळ्या झाडल्या. जखमी झाल्यानंतर त्यास ताब्यात घेत तत्काळ आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.


एकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू...


सिंग नानक सिंग गील हा सध्या तो पॅरोलवर बाहेर आला आहे. मात्र, त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही. दरम्यान, रविवारी दुपारी शेरूसिंग याने हातात तलवार अन् खंजीर घेऊन गुरूद्वारा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्याने जुन्या किरकोळ वादातून हरदिपकसिंघ पाठी उर्फ राजू यांच्या घरावर हल्ला केला. तसेच, त्यांना मारण्यासाठी त्यांच्या मागे तलवार घेवून लागला. या भीतीने हरदिपकसिंघ पाठी उर्फ राजू यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 


पोलिसांनी एकूण चार गोळ्या झाडल्या...


हातात तलवार, खंजीर घेऊन फिरणाऱ्या सिंग नानकमुळे परिसरात एकच दहशत निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी आरोपीकडून थेट सिलेंडर पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. परिस्थिती लक्षात घेता वजिराबादचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी पहिल्यांदा आरोपीच्या दिशने गोळी झाडली. ती आरोपीच्या डाव्या पायावर लागून तो जखमी झाला. मात्र, त्यानंतर सुद्धा तो पोलिसांच्या दिशेने सिलिंडर फेकण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे, घोरबांड यांनी दुसरी गोळी झाडली. याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक माने यांनीही दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे आरोपी जखमी झाला आणि मोठा अनर्थ टळला. तब्बल तीन तास हा सिनेस्टाईल थरार सुरु होता. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Mumbai News : सीआयएसएफ कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य, मुंबईतील बीकेसी परिसरातील घटनेमुळे खळबळ