Nanded News : आधी उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिल्यानंतर परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी शिवसेनेवर (शिंदे गट) जोरदार हल्लाबोल केला आहे. "पन्नास खोके काय शंभर खोके आले तरी माझ्या खुर्चीसमोर ते मला ठेंगणे वाटणार, पक्षाशी बेईमानी करणे माझ्यात रक्तात नाही," असं वक्तव्य परभणी (Parbhani) जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव  यांनी केले. नांदेडमध्ये (Nanded) रविवारी (5 मार्च) आयोजित शिवगर्जना कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार बंडू जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाच्या संपर्कात आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावर खासदार जाधव यांनी कडक शब्दात आपले मत व्यक्त केले. 


"मी सामान्य कुटुंबातील शेतकरी मुलगा आहे. माझ्या मागे कुठलीही राजकीय पार्शवभूमी नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे मला परभणीमध्ये सर्व पदावर काम करण्याची संधी मिळाली. सात जन्म ही मी या पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही, तेवढे मला पक्षाने दिले आहे. ज्या पक्षाने वाढवले त्या पक्षासोबत पाईक राहणे हे आपले कर्तव्य आहे," असे वक्तव्य देखील खासदार बंडू जाधव यांनी केले.


परभणी जिल्हात ठाकरे गटाची शिवसेना शाबूत राहणार असे आश्वासन देखील जाधव यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वजिराबाद परिसरातील मल्टी पर्पज हायस्कूलच्या मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते.


ठाकरेंना घरचा आहेर


दरम्यान, पक्ष सोडणार नसल्याचे बंडू जाधव यांनी स्पष्ट केले असलं तरी एक दिवस आधीच त्यांनी ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. ते म्हणाले होते की, "उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) मंत्री करायला नको होते. त्यांनी कुणाकडे तरी पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे होते. दोघांनी खुर्च्या अडवल्यामुळे ही गद्दारी झाली. महाविकास आघाडीची सत्ता असताना अडीच वर्षे आमचा जो लाभ व्हायला हवा होता तो झाला नाही. तो काळ असाच गेला. एक सत्तेचा भाग जो आपल्याला मिळायला हवा होता तो मिळाला नाही याचं दु:ख होतं. ही वस्तुस्थिती आहे, मी केवळ त्यावर बोलत आहे. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी पक्ष संघटनेला वेळ द्यायला होता तो दिला नाही म्हणून आमच्यावर ही वेळ ओढावली. यामुळेच चोरांना संधी मिळाली."



संबंधित बातमी


Sanjay Jadhav : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर पोराला मंत्री करायला नको होतं, खासदार संजय जाधवांचा ठाकरेंना घरचा आहेर