मुंबई: पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने चोमडेपणा केला आणि गद्दारांना चिन्ह दिलं, निवडणूक आयोगावरून आमचा विश्वास उडाला आहे, तो चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपला वाटेल ते काम आणि वाटेल तसं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मोगॅंबोच्या कितीही पिढ्या उतरल्या तरीही शिवसेना संपणार नाही असंही ते म्हणाले. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने या गोष्टी करायला नको होत्या. रामविलास पासवान यांच्या मुलाला एक आणि त्याच्या काकाला एक चिन्ह दिली, पण ते दोघेही भाजपसोबत असल्याने त्यांचा पक्ष आहे. आता केंद्र सरकारला वाटेल तसा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जातोय. 


बाकी सगळं चोरता येतं पण आई-वडिलांनी केलेलं संस्कार चोरता येत नाही, ज्यांच्यावर संस्कार नसतात त्यांना चोरीचा माल लागतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात पण तुम्ही ठाकरे हे नाव कसं चोरणार, हे ठाकरे सगळं शिवसेना कुटुंब आहे असंही ते म्हणाले. आपले आई वडील अडगळीत टाकून दुसऱ्यांचे बाप चोरता, लोक चोराल, विचार चोरता येणार नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


ज्या हेतून शिवसेनेची स्थापना केली होती तो हेतू साध्य झाल्याचं समाधान आहे. ज्या ठिकाणी मराठी माणसाला स्थान नव्हतं त्या ठिकाणी आता शिवसेनेमुळे मराठी माणसाला सन्मान मिळतोय.


शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या संरक्षणासाठी झाला. तो काळ वेगळा होता. आजच्या पिढीला कदाचित ते पटणार नाही. मराठी माणूस त्यावेळी भिकेचं कटोरं घेऊन उभा होता, बाळासाहेबांनी त्यांच्या हाती तलवार दिली, त्यांना संघर्ष करायला शिकवलं. रावते, देसाई ही लोकं त्यावेळी होती, हे आचजे पावटे नव्हते तेव्हा.


ज्या-ज्या वेळी गद्दार त्यांच्या छातीवरती धनुष्यबाण लावाल त्या-त्या वेळी त्यांच्या गद्दारांच्या कपाळी लिहिलं असेल, अरे तूच गद्दार आहेस असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज निष्ठावान किती जन्माला आले आहेत आणि गद्दार औलादी किती जन्माला आल्या आहेत हे ठरवण्याचा काळ आहे असं ते म्हणाले. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या बांडगुळांना वाटतंय तेच वटवृक्ष झालेत. पण त्यांची पाळमुळ छाटली की ते गळून पडतील हे त्यांनी ध्यानात ठेवावं. अन्याय जाळायची असेल तर मशाल पेटवावी लागेल. मी आव्हान देतो, तुम्ही धनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येतो आणि बघुया लोक कोणासोबत आहेत ते. दूध का दूध, पाणी का पाणी हे आम्ही करणार आणि तुमचं गोमूत्र कसं आहे हेदेखील आम्ही सांगणार. 


ही बातमी वाचा: