Nanded News : नांदेड जिल्ह्यात (Nanded District) बोगस गुंठेवारी, बोगस एन.ए.लेआऊट आणि नांदेड महापालिकेतील (Nanded Municipal Corporation) बोगस गुंठेवारी पावत्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण याच बोगस गुंठेवारीच्या प्रकरणात आता केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी- ED) नागपूर विभागाची एन्ट्री झालीय. बोगस गुंठेवारी गुन्ह्याच्या संदर्भात ईडीच्या अधिकार्‍याने महानगरपालिका आयुक्तांची व पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेवून पत्राद्वारे माहिती मागितली असल्याचा दुजोरा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी दिलाय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 


नांदेड जिल्ह्यात व महापालिकेमध्ये बोगस गुंठेवारी प्रकरणात रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्यात गुंठेवारी बोगस पावत्या व गुंठेवारी संचिका, प्रमाणपत्रावर अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम व अन्य दोन अभियंत्यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. किंबहुना हा प्रकार एवढ्यावरच न थांबता गुंठेवारीचे शुल्क महापालिकेच्या फंडात भरणार्‍या पावत्या देखील बनावट जोडण्यात आल्या होत्या. महापालिकेतील या बोगस गुंठेवारी प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यामध्ये रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या पाच जणांविरुध्द यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी गुंठेवारीच्या दोन संचिका ताब्यात घेतल्या असून, स्वाक्षर्‍या तपासण्यासाठी त्यांनी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आल्याची माहिती आहे. 


ईडीने मागवली माहिती... 


एकीकडे वजिराबाद पोलिसांकडून बोगस गुंठेवारी प्रकरणात तपास सुरु असतानाच, काल नागपूरच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी)चे अधिकारी महापालिकेत दाखल झाले. ज्यात त्यांनी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांची भेट घेवून गुंठेवारी प्रकरणाची माहिती एका पत्राद्वारे मागितली आहे. ज्यात याप्रकरणात सहभागी व्यक्ती, अधिकारी यांचे नाव, गुन्ह्याची खोली, ऑपरेंडी यासह इतर कोणतीही संबंधित माहिती, कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागितली असल्याची माहिती समोर येत आहे. 


असा सुरु आहे तपास! 



  • या प्रकरणात गुंठेवारीतील 6  हजार 380 संचिका तपासण्याचे काम मनपाकडून सुरु झालेय.

  •  ज्यात महापालिकेतील 6  हजार 380 गुंठेवारीच्या प्रकरणाला मंजुरी देवून प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले आहेत. 

  • बोगस गुंठेवारीचे प्रकरण समोर आल्यानंतर या संपूर्ण संचिका एकत्रित करण्याचे काम पूर्ण झाले असून प्रत्येकी 40 ते 50 संचिकेचे गठ्ठे क्रमवारीने बांधण्यात आले आहेत. 

  • आता प्रत्येक संचिकेवरील स्वाक्षरी आणि शुल्क भरलेल्या पावत्यांची तपासणीचे काम गुंठेवारी विभागात 3 उपअभियंता, 4 कनिष्ठ अभियंता, 6  रोड कारकुन, 3 लिपीक यांच्याकडून काल पासून सुरु करण्यात आले आहे. 

  • त्यामुळे आणखी शुल्क भरलेल्या किती बनावट पावत्या आहेत, याचे देखील पितळ उघडे पडणार आहे.

  • दरम्यान यात आणखी किती स्वाक्षर्‍या आणि शुल्क भरलेल्या बनावट पावत्यांचा भांडाफोड होणार आणि या प्रकरणात अजून किती मासे गळाला लागणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.


संबंधित बातम्या: 


Nanded: नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी विभागाला आग, महत्वाच्या संचिका जळून खाक