Nanded: भारतीय राज्यघटनेने तृतीयपंथीय अर्थात किन्नरांना इतरांसारखेच समान अधिकार बहाल केलेले असून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथीय असलेल्या सेजलला प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातच सेतू सुविधा केंद्र हस्तांतरीत केले आहे. त्यामुळे नांदेडची सेजल भारतातील पहिली तृतियपंथीय सेतू केंद्र चालक बनली आहे.


हाताच्या टाळीवर भिक मागून आयुष्य जगणाऱ्या तृतीयपंथीय समाज आता मुख्य प्रवाहात येतांना पाहायला मिळत आहे. अनेक तृतीयपंथीय आता चांगलं आणि दर्जेदार शिक्षण घेऊन आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. अशीच काही कहाणी नांदेडच्या सेजलची आहे. सेजलने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आता स्वतःचा सेतू केंद्र सुरु करत देशात इतिहास रचला आहे. 


स्वतः तृतीयपंथीय असलेल्या नांदेडच्या गौरीने तिच्यासारख्या अनेकांना आतापर्यंत आसरा देत त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी उचलली. दरम्यान उत्तर प्रदेशात राहणारी सेजलला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी ती तृतीयपंथीय असल्याने घरातून काढून दिले. त्यानंतर सेजल वयाच्या आठव्या वर्षी गौरीला येऊन भेटली. गौरीनेही तिचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. एवढच नाही तर तिला बीकॉम पर्यत शिकवलं सुद्धा आणि आपल्या पायावर जगण्यासाठी तयार केलं.


लाभार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे


सेजलचं शिक्षण पाहता काही सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने देशातील पहिले तृतीयपंथीयांचे सेतू सुविधा केंद्र सेजलला मिळाले आहे. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच किन्नर सेजलला सेतू सुविधा केंद्र जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सन्मानपूर्वक हस्तांतरीत केले. तर या  अद्यावत सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन पार पडताच चार लाभार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे प्रातिनिधीक स्वरुपात ऑनलाईन काढून देण्यात आली. 


कौतुकास्पद प्रयत्न 


तसं पाहिलं तर समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकला गेलेला, कुटुंब, आप्तेष्ठ, समाजातून बहिष्कृत समजला जाणारा घटक म्हणजे तृतीयपंथीयांकडे पाहिले जातात. यांचं जीवन अत्यंत हलाखीचे असते. ज्यात जीवन जगत असतान, बाजार पेठेतील प्रत्येक दुकानांवर, शहरभर फिरून टाळी वाजवत भीक मागून उदरनिर्वाह करण्यापलीकडे कोणताही उद्योग त्यांना मिळत नाही. मात्र आता अशातच गौरी आणि सेजल सारख्या किन्नर आता स्वतःला आणि आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून स्वतःच्या पायावर उभं करण्याचा करत असलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.