Lumpy Skin Diseas: राजस्थानसह देशभरात चिंता वाढवणाऱ्या पशुधनातील लंपी आजार आता  महाराष्ट्रात सुद्धा पाय पसरवतांना पाहायला मिळत आहे. तर राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. विखे पाटील हे आज नांदेड दौऱ्यावर होते, यावेळी मिनी सह्याद्री अतिथी गृहाच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते.


यावेळी बोलतांना विखे पाटील म्हणाले की, संपूर्ण राज्यात लंपी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला असून मी प्रत्यक्ष फिरुन आढावाही घेत आहे. राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लंपी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन विखे-पाटील यांनी केले आहे.


मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध 


पुढे बोलतांना विखे पाटील म्हणाले की, ज्या जनावरांना लंपी आजार झाला आहे अशा जनावराना बाजूला ठेवून त्यावर औषधोपचार तात्काळ सुरु केले पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना, पशुपालकांना लंपी आजार लसीकरण दृष्टीकोनातून काही कमी पडू दिले जाणार नाही असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. सध्या ज्या गावात लंपी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघा पर्यत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. 5 किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.


शासनातर्फे अर्थसहाय्य 


तर लंपी आजारामूळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी 30 हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी 25 हजार रुपये, लहान कारवडी असल्यास 16 हजार रुपये मदत दिली जात असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. याव्यतीरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.


महत्वाच्या बातम्या...


Lumpy Skin Disease : दूध तुटवडा असल्याची अफवा पसरवल्यास कारवाई होणार, विखे पाटलांची माहिती, पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय  


Lumpy Disease : लंपी झालेल्या गायीचे दुध प्यायल्यास माणसांना लम्पी रोग होतो का? आरोग्य मंत्री भारती पवार म्हणाल्या...