Nanded News: नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) मुखेड तालुक्यातील सावरगावात पिसाळलेल्या एका मोकाट कुत्र्याची (Loose Dog) दहशत पाहायला मिळत आहे. या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने गावात धुमाकूळ घालून तब्बल आठ जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर यात चार जणांना चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलवण्यात आलं आहे. ग्रामपंचायतीने मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करून बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेडच्या मुखेड तालुक्यातील सावरगावात एक पिसाळलेला कुत्रा फिरत आहे. त्याने 23 जानेवारी रोजी या कुत्र्याने आठ जणांना चावा घेतला. गावात पिसाळलेला कुत्रा चावा घेत असल्याची माहिती काही वेळात पसरली आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरील नागरिक या कुत्र्याला पाहून सैरावैरा पळताना दिसून आले. विशेष म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याने दिसेल त्या नागरिकांच्या शरीराचे लचके तोडले. त्यामुळे भीती आणखीनच वाढली आहे.
दरम्यान, गावात दिसेल त्याच्या अंगावर धावून जात हा पिसाळेला कुत्रा चावा घेत होता. याचवेळी गावातील एका बालकाच्या गळ्याला देखील त्याने चावा घेतला. त्यात हा मुलगा जखमी झाला होता. जखमी मुलाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. डॉ. प्रसाद नुन्नेवार, डॉ. शिल्पा कळसकर यांनी त्याच्यावर उपचार केले. या घटनेमुळे पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यांना घेतला चावा...
अस्लाम मोहम्मद बागवान (वय 10 वर्षे), मैजुद्दिन खमरोद्दिन मुजावर (वय 48 वर्षे), कौसाबाई गंगाराम कुद्रे (वय 65 वर्ष), मुमताज पाशासाब खुरेशी (वय 05 वर्षे), साहेबराव हुंडेकर (वय 25 वर्षे), जाकेरा सुलतान खुरेशी (वय 41), जबिन रसुल खुरेशी (वय 20 वर्षे), ओमकार सुभाष ढुमणे (वय 13 वर्षे), सर्व जण सावरगाव येथील आहे.
गावात भीतीचं वातावरण!
सावरगावात पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिसेल त्याला हा कुत्रा चावा घेत असल्याने, नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालं आहे. तर हा कुत्रा लहान बालकांना देखील चावा घेत असल्याने पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अनेकजण हातात काठ्या-लाठ्या घेऊन घराबाहेर पडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी उपाययोजना करून बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: