Maharashtra Nanded News : नांदेड (Nanded) जिल्ह्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय, ज्यात हदगाव हिमायतनगर (Hadgaon-Himanagar Area) मतदारसंघाचे दावेदार आणि शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम यांनी हजारो शिवसैनिकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा आणि शिंदे गटात (CM Eknath Shinde) सामील होण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohalikar) यांची पुढील राजकीय दिशा काय असणार याची सर्वत्र चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. परंतु, आज केलेल्या शक्ती प्रदर्शन आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यातून या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 


हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथे बाबुराव कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता परिसंवाद  मेळाव्यात, "आला बाबुराव" गाणं वाजवत आणि या गाण्यावर बाबुराव कदम यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी ठेका धरत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हदगाव मतदार संघात आणून हदगाव हिमायतनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करायला लावून शिंदे गटात सामील होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या येण्यानं बळ मिळालेल्या नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेला हदगाव तालुक्यात मोठं खिंडार पडलं आहे.


बाबुराव कदम कोहळीकर हे हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात निवघा जिल्हा परिषद निवडणुकीपासून सुरू केली असून त्या गटातून ते दोन वेळा विजयी झाले होते. सतत पंचवीस वर्षे त्यांनी आपल्या गटावर शिवसेनेचा भगवा फडकविला होता हे सर्वश्रुत आहे.


सन 2008  साली त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढवली, ज्यात कोहोळीकर यांचा पराभव झाला होता, असे असतानाही पराभवाचे शल्य मनात न बाळगता त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण सुरूच ठेवले होते. त्यांच्याकडे शिवसेनेची मोठी फळी होती. आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर आणि शिवसैनिकांच्या ताकदीवर त्यांनी सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवला होता. 


काही महिन्यातच कोहळीकर यांचे शिवसेना माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांच्याबरोबर जिल्हाप्रमुख पदावरुन राजकीय वैमनस्य सुरू झाले. त्यातच आष्टीकर यांनी आपली राजकीय ताकद वापरून कोहोळीकरांचे जिल्हाप्रमुख पद काढून घेतले. दरम्यान जिल्हाध्यक्ष पद काढून घेतल्यानं निष्ठावंत शिवसैनिकांत नाराजीचा सूर पसरला होता. याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत बघावयास मिळाला. ज्यात कोहोळीकरांनी पक्षानं उमेदवारी न दिल्यानं ते बंडाचा झेंडा हातात घेऊन 2019 साली अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणुकीत क्रमांक दोनची मते घेतली. अपक्ष उमेदवार असणाऱ्या कोहळीकरांनी इतिहास घडवला. त्यामुळे त्यांची राजकीय ताकद वाढली.


विधानसभा निवडणूक पार पडून अडीच वर्षाचा कालखंड लोटला. यादरम्यान बाबुराव कदम कोहळीकर परत शिवसेनेत येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. परंतु या चर्चा वेळोवेळी थंडावल्या गेल्या त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची ही बातमी माध्यमांपर्यंत आली होती. माजी खासदार वानखेडे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर  कोहोळीकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार या चर्चेला आता वेग आला असून याच अनुषंगाने आपली राजकीय दिशा ठरवण्यासाठी बाबुराव कदम  यांनी आज हजारो वाहनांचा ताफा घेऊन "आला बाबुराव" गाणं वाजवत समर्थकांच्या उपस्थितीत कार्यकर्ता परिसंवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या बैठकीत त्यांची राजकीय दिशा ठरवत शिंदे गटात सामील होण्याचं निश्चित केलं.  


हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत बाबुराव कदम कोहोळीकर यांचे कौटुंबिक संबंध आहेत हेमंत पाटील यांनीच त्यांना मागच्या काळात जिल्हाप्रमुख पदावर विराजमान केले होते.तर हेमंत पाटील यांना लोकसभेत पाठवण्यासाठी कोहोळीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशानंतर कोहोळीकरही आता शिंदे गटात सामील होणार आहेत. 


हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील मंगल कार्यालयात शेतकरी नेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता परिसंवादात मेळाव्यात पुढील दिशा ठरवलीय.ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हदगाव मतदार संघात आणून हदगाव हिमायतनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करायला लावून शिंदे गटात सामील होणार असल्याचे जाहीर केलंय.