Maharashtra Nanded News: मराठी नववर्षाचा सण उंबरठ्यावर असताना अस्मानी संकटानं बळीराजाचं पार कंबरडं मोडलं आहे. वादळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीनं (Hailstorm) हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं जगाचा पोशिंदा कोलमडून पडला आहे. सरकारकडूनही (Maharashtra Government) तातडीनं मदत मिळण्याची चिन्हे दिसत नसल्यानं ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी शेतकरी वर्गात निराशेचं वातावरण आहे. 


नांदेड (Nanded News) जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या वादळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीतील उभी पिकं भुईसपाट झाली आहेत. डोक्यावरील कर्जाचा भार, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता अशा गर्तेत असणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामापासून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु वादळी पाऊस आणि गारपीट यांनी शेतकऱ्यांच्या सर्व आशाआकांक्षा धुळीला मिळवल्या आहेत. एकट्या नांदेड जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार, जवळपास 24 हजार क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड, किनवट, हिमायतनगर या तालुक्यांना गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला आहे. 


निसर्गाच्या अवकृपेनं नुकसान झाल्यानंतर सरकारचा मदतीचा हात पुढे येईल, अशी अपेक्षा होती. परंतु राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नुकसानीचे पंचनामेच अजून झाले नाहीत. संप मिटल्यानंतर आता पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आधीच चिंतेनं ग्रासलेल्या बळीराजाच्या चिंतेत अजून भर पडली आहे. 




अवकाळीचा शेतीसोबतच उद्योगांनाही फटका 


वादळी पाऊस आणि गागपीटीचा फटका शेतकऱ्याप्रमाणेच काही उद्योगांनाही बसला आहे. हदगाव तालुक्यातील एका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचं छप्परच वादळात उडून गेल्यानं लक्षावधी रुपयाचे नुकसान झालं आहे. दरम्यान, अस्मानी संकटानं बळीराजा पार खचून गेला आहे. अशा वेळी शासनानं तातडीने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार मराठवाड्याचे असल्यानं या भागातील शेतकऱ्यांना त्यांनी तातडीनं दिलासा द्यावा, अशी नुकसानग्रस्तांची अपेक्षा आहे.




अंधारातच नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करतायत कृषीमंत्री 


नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. द्राक्ष, कांदा, गहू,  भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झालं. सरकारी कर्मचारी संपावर गेल्यानं पंचनामे रखडले होते. मंगळवारी पंचनाम्यांना सुरुवात झाली. आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी खुद्द राज्याचे कृषीमंत्री येणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होतं. दुपारी कृषीमंत्री येणार असल्यानं शेतकऱ्यांची गर्दी झाली. सर्वांचे डोळे कृषीमंत्र्यांकडे लागले होते. मात्र, दुपारी येणारे कृषीमंत्री निफाड तालुक्यात येता-येता अंधार पडला. त्यानंतर लगबगीनं कृषीमंत्र्यांनी कुंभारी गावात एका द्राक्ष बागेची पाहाणी केली अन् सुरू झाली कृषीमंत्र्यांच्या नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्याची औपचारिकता. 


कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा केली. मात्र शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यापेक्षा आपल्याला यायला कसा उशीर झाला? का उशीर झाला? आपण कसे नॉन स्टॉप आलो, ट्रॅफीक होतं. अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा करुन कृषीमंत्र्यांनी तिथून काढता पाय घेतला.