Ram Navami 2023 : राज्यासह देशभरात आज राम नवमीचा (Ram Navami) उत्साह पाहायला मिळतोय. गेल्या काही काळात कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक निर्बंध पाहायाला मिळाले होते. मात्र यावेळी राम नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्ह्यात देखील आज मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी करण्यात आली आहे. तर रामजन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध मंदिरांत उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दुपारी 12 वाजता मंदिरांत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. तर सकाळी अभिषेक, होमहवन आणि पूजाविधी करण्यात आल्या. दरम्यान रामजन्मोत्सवानिमित्त सकाळी शहरात 2 वाहन रॅली काढण्यात आल्या, तर सायंकाळी पाच शोभायात्रा निघणार आहे.  विशेष म्हणजे किराडपुऱ्यातील 400 वर्षे पुरातन अशा श्रीराम मंदिर मठ बालाजी ट्रस्टमध्ये मानाची आरती करण्यात येते. 


Dharashiva Ram Navami : छत्रपती संभाजीनगरप्रमाणे धाराशिव शहरातील समर्थ नगरच्या श्रीराम मंदिरात कलायोगी आर्ट्स धाराशिवच्या विद्यार्थ्यांकडून 11 फूट उंच,16 फूट रुंद अशी एकूण 176 चौरस फूट आकाराची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. रांगोळीतून प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, हनुमान यांची प्रतिमा साकारण्यात आली. दरम्यान यासाठी 45 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला असून, ज्यासाठी 5 तास 30  मिनिटांचा तासाचा कालावधी लागला आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती पाहण्यासाठी राम भक्त गर्दी करताना दिसत आहेत.


Hingoli Ram Navami : श्रीराम नवमी निमित्त आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने हिंगोली शहरांमधून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सिटी क्लबपासून निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरून गेली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी सहभाग नोंदवला होता. डीजेच्या तालावर लावलेले गाणी आणि नागरिकांचा उत्साह रामनवमीचा आनंद द्विगुणीत करीत होता. दरम्यान, हिंगोली पोलिसांच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने या रॅलीसाठी चोख बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता.


Nanded Ram Navami : रामजन्मोत्सवानिमित्त आज नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महावीर चौक ते अशोक नगर हनुमान मंदिर पर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत महिला वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी झाला होता. तसेच भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा सह 2000 युवक या रॅलीत सहभागी झाले होते. 


Jalna Ram Navami : श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने जालना शहरात देखील उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान शहरात मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे. मिरवणुकीस अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी करुन मार्गात अडथळा निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यादृष्टीने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जारी केले आहेत. 


Beed Ram Navami : बीडच्या श्रीक्षेत्र नेकनूर येथे कीर्तनाच्या जयघोषात पारंपारिक पद्धतीने भजन अनोखा रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने महिला पुरुष भाविक भक्तांची उपस्थिती होती. रामजन्मोत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यावेळी प्रभू रामचंद्राच्या जय घोषाने परिसर दुमदुमून निघाला. तसेच आष्टी तालुक्यातल्या दादेगाव मध्ये रामनवमीनिमित्त कावड यात्रेचा मोठा उत्सव पाहायला मिळाला. समर्थ रामदासांनी 375  वर्षांपूर्वी दादेवावात गावात गंडकी शिळापासून पासून तयार केलेल्या रामाच्या मूर्तीची स्थापना केली होती. तेव्हापासून या ठिकाणी रामनवमीनिमित्त गावातील तरुण पैठण येथून कावड यात्रा घेऊन या राम मंदिरात महाअभिषेक करतात. या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  तर संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्रभू रामाची महाआरती देखील केली.


Parbhani Ram Navami : परभणी शहरात देखील याही वर्षी रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 9 वर्षांपासून रामभक्त ऐतिहासिक शोभायात्रा काढतात. तर श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये अश्व, वासुदेव गोंधळी, भजनी, वारकरी मंडळी, फेटेधारी महिला, भगवे ध्वज हातात घेतलेले युवक असतील. लहान वानरसेना, प्रभू श्रीरामांची पालखी असेल. सोबत सोलापूर येथील प्रसिद्ध हलगी पथक, भगवा रंग उधळणारी मशीन सोबत असेल. शोभायात्रेचे मुख्य आकर्षण 16 फुटी सजीव हनुमान असतील जे सर्वांसोबत पायी चालतील, विविध पाच सजीव देवाचे देखावे असतील.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ram Navami 2023 Live Updates : देशभरात रामनवमीचा उत्साह, शिर्डीत विविध कार्यक्रम; सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...