Ram Navami 2023 Live Updates : देशभरात रामनवमीचा उत्साह, शिर्डीत विविध कार्यक्रम; सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Ram Navami 2023 Live Updates : आज देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यासह देशभरातील रामनवमी संदर्भातील सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर जवळ वांगणीत रामनवमी निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन झालं. पवित्र रमजान महिन्यात आलेली रामनवमी हा दुग्धशर्करा योग्य असल्याचं सांगत मुस्लिम धर्मियांनीही भक्तिभावाने रामनवमीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. वांगणी गावात 1826 सालापासून रामनवमी उत्सव साजरा होतोय. या उत्सवाचं यंदा तब्बल 197 वावं वर्ष आहे. वांगणी गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय अनेक वर्षांपासून एकोप्याने राहतायत. रामनवमीच्या पालखी सोहळ्यातही मुस्लिम धर्मीय उत्साहाने सहभागी होतात. आजही वांगणी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर मुस्लिम मोहल्ल्यासह संपूर्ण गावात ही पालखी फिरली. या पालखीत घोडे, रथ यासह वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वांगणी गावातील ही पालखी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असल्याचं यावेळी गावातील हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी सांगितलं.
सोलापुरात श्रीराम नवमीचा उत्साह शिगेला,
शहरातील विविध मंडळांच्या निघाल्या राम नवमीनिमित्त मिरवणुका,
सोलापूर शहरात जवळपास 26 मंडळांच्या मिरवणुका निघालेल्या आहेत,
या मिरवणुकींमध्ये आकर्षक देखावे साकरण्यात आले आहेत,
तरुणाई देखील डीजेच्या तालावर थिरकत आहे.
रामनवमीला यवतमाळ शहरात भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृती, लोकसभ्यता आणि विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी ही अनोखी शोभायात्रा ठरली यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी.
रामनवमी शोभायात्रा आकर्षक आणि आदर्शवत ठरली आहे. जयहिंद चौकातील श्रीराम मंदिरातून श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. यंदा नवीन दाक्षिणात्य शैलीच्या कलाकृतीत साकारण्यात आलेल्या आकर्षक अशा सुशोभित रथामध्ये हा रामदरबार विराजित करण्यात आला आहे. हा रामरथ रामभक्तांद्वारे शोभायात्रा मार्गावर हाताने ओढण्यात येणार असून महिला पुरुष आबालवृद्धांच्या या सर्वसमावेशक शोभायात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण केरळ येथील कलावंतांचा समूह असून. केरळ ड्रम बीट्स म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध चंदा मलम वाद्य आणि त्यावरील अप्रतिम कलाविष्कार लक्ष वेधून घेणारे ठरले. तसेचडोळे व चेहऱ्याचे भावपूर्ण हावभाव सादर करणारे 'कथकली' नृत्य देखील सादर करण्यात येत आहे. शोभायात्रेत प्रभू श्रीरामांचे प्रिय भक्त हनुमानाची 10 फूट उंच महाबली रूपातली वेशभूषा करून ढोल ताश्यावर थिरकणारे कलावंत हे देखील आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यांच्या अवतीभवती पुलिकाली हा प्रसिद्ध असा वाघनृत्य प्रकार कलावंत सादर केला आहे. यासोबतच पांढरकवडा येथील पारंपारिक आदिवासी दंडार नृत्य, दारव्हा तालुक्यातील शंभर जणांचे लक्षवेधी भजनी मंडळ, कोलाम पोटांवरील डफ वाजविणारे 20 जणांचे पथक, विविध रामायणकालीन चलचित्र देखावे तसेच सामाजिक प्रबोधन करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीची झलक दर्शविणाऱ्या 70 हून अधिक झांक्या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
आज श्रीराम नवमीचा उत्साह देशभरात पाहायला मिळतोय, त्याच पद्धतीने हिंगोलीच्या वसमत शहरातसुद्धा हाच उत्साह कायम दिसला आहे. राम भक्तांच्या वतीने हिंगोली शहरातील प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेमध्ये राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा केलेले युवकसुद्धा पाहायला मिळाले. तर राम हनुमान यांच्या मूर्तीसुद्धा या शोभायात्रेमध्ये दिसून आल्या. या शोभायात्रेत हजारो राम भक्तांनी सहभाग घेतला होता.
नागपूरातील रामनगर येथील राम मंदिरातून थोड्या वेळात प्रभू श्रीराम यांच्या शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे....
या शोभा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीच्या काही वेळ उपस्थित राहणार आहे...
राम मंदिरातून छोटी पालखी खांद्यावर वाहत फडणवीस आणि इतर पाहुणे मंदिराच्या बाहेर आणतील...
त्यानंतर मंदिराच्या समोरून शोभा यात्रेला सुरुवात होईल...
पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणारी शोभायात्रा नागपूरातील मध्य आणि पूर्व नागपूरातून फिरते...
तर राम नगरातील राम मंदिरातून निघणारी शोभायात्रा पश्चिम नागपूरातून फिरते...
चैत्र शुद्ध नवमी असल्याने नाशिकच्या लासलगाव येथे राम मंदिरात रामजन्म उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. राम मंदिरातून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत असा नऊ दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो. सकाळी रामजन्माचे कीर्तन संपन्न होऊन भाविकांनी राममूर्तीवर फुले गुलाल उधळून, टाळ मृदुंगाच्या गजरात रामनामाचा जयजयकार करण्यात आला. श्रीराम नवमी उत्सवानिमित्त परिसरातील भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. यावेळी रामनवमी उत्सवासाठी विश्वस्त, पुजारी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामी यांच्या जांब या जन्म गावी आज प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समर्थांचा जन्म रामनवमीच्या दिवशीच झाल्याने यावेळी प्रभू श्रीराम आणि समर्थांच्या मूर्तींची विधिवत पूजा करून, राम आणि समर्थांचा पाळणा गात भाविकांनी हा जन्मोत्सव साजरा केला. दरम्यान 22 ऑगस्ट 2022 रोजी समर्थांच्या याच मंदिरातून समर्थांच्या देवघरातील या राम, सीता, भरत, शत्रूग्न यांच्या मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्या मूर्ती शोधण्यात पोलिसांना यशही आले होते. त्यामुळे आजच्या उत्सवाला मोठं महत्व होत. आज जांब या गावी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्रीरामनवमीच्या निमित्ताने एकत्र येत दिवसभर या उत्सवात सहभाग घेतला.
Sindhurdurg Mangaon Ramjanmostav : तळकोकणातील यक्षिणी मंदिर हे फार पुरातन असून चौसष्ठ योगिनीं पैकी एक यक्षिणी देवीच मंदिर सिंधुदुर्गातील कुडाळ मधील माणगावचे ग्रामदैवत असून या मंदिरात आज पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. रामजन्म कथेमध्ये रामाच्या जन्मचवेळी सजवलेल्या पाळण्यात राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो भक्तांनी राम नामाच्या जयघोषात रामजन्म उत्सव साजरा केला. राम जन्म सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सिंधुदुर्गात गावागावांत आज राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळाल.
Indore Accident : देशभरात आज रामनवमीचा (Ram Navami 2023) उत्साह असतानाच मध्य प्रदेशातील इंदूरमधून (Indore) धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील (Well) छत कोसळल्याने 25 हून अधिक जण विहिरीत पडले. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Akola Ramnavmi Rally : अकोल्यात रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने आज मोटरसायकल रॅली काढण्यात आली. शहराचं दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून या रॅलीला सुरूवात झाली आणि शहराच्या मुख्य मार्गांवरून बिर्ला राम मंदिराजवळ या रॅलीचा समारोप झालाय. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांसह सर्वच पक्षाचे लोक या रॅलीत सहभागी झाले.
Beed Ram Navami : बीडच्या श्रीक्षेत्र नेकनूर येथे कीर्तनाच्या जयघोषात पारंपारिक पद्धतीने भजन करत रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. किर्तन महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांचं किर्तन संपन्न झालं. यावेळी हजारोच्या संख्येने महिला पुरुष भाविक भक्तांची उपस्थिती होती. जन्मोत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यावेळी प्रभू रामचंद्राच्या जय घोषने परिसरातील दुमदुमून निघाला. प्रभू राम हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यांचे आदर्श तत्व आजही इथला समाज व्यवस्थेला दिशा दाखवतात असे महाराजांनी सांगितले.
Dharavi Ram Navami Rangoli : धाराशिव शहरातील समर्थ नगरच्या श्रीराम मंदिरात कलायोगी आर्ट्स धाराशिवच्या विद्यार्थ्यांकडून 11 फूट उंच,16 फूट रुंद अशी एकूण 176 चौरस फूट आकाराची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. रांगोळीतून प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण, हनुमान यांची प्रतिमा साकारण्यात आली यासाठी 45 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला असून 5 तास 30 मिनिटांचा तासाचा कालावधी लागला आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती पाहण्यासाठी राम भक्त गर्दी करताना दिसत आहेत.
Hingoli Ram Navami 2023 : श्रीराम नवमी निमित्त आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने हिंगोली शहरांमधून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सिटी क्लबपासून निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरून जाणार आहे. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी सहभाग नोंदवला होता विजेच्या तालावर लावलेले गाणे आणि नागरिकांचा उत्साह रामनवमीचा आनंद द्विगुणीत करीत होता. दरम्यान, हिंगोली पोलिसांच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने या रॅलीसाठी चोख बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता.
Mumbai MNS Ramnavmi : देशभरात राम नवमीचा उत्सव ठिकठिकाणी साजरा होत असताना मुंबईत देखील विविध पक्षांकडून रामनवमीचा सण साजरा केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर ठिकठिकाणी मनसैनिक राम नवमी साजरी करतायत.
Shegaon Ram Navami 2023 : राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या असून, आज सकाळी सात वाजता आरतीने रामनवमी मुख्य उत्सवास सुरूवात होणार आहे. दुपारी रथ, अश्वासह पालखीची नगर परीक्रमा असे दिवसभर अनेक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. मुख्य आरती दुपारी बारा वाजता असणार आहे. रामनवमी उत्सवासाठी जवळपास साडेपाचशे दिंड्या आणि दोन लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच यावर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात शेगावात साजरा होत आहे. राज्यासह शेजारील मध्यप्रदेश आणि गुजरातमधील भाविकही शेगावात दाखल झाले आहेत. आज योगायोगानं गुरुपुष्यामृतही असल्यानं दिवसभर शेगावात उत्साहाच वातावरण बघायला मिळत आहे.
Amravati Coffee House Hanuman Chalisa : अमरावती शहरातील कॅम्प परिसरातील बारिष्टा कॅफे हाऊसमध्ये विद्यार्थी एकवटले आणि हनुमान चालीसा पाठ सुरू केलाय. एरवी कॉफी हाऊसमध्ये अनेकजण कॉफी प्यायला जातात मात्र, अमरावती शहरात विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. कॉफी हाऊसमध्ये हनुमान चालीसा पठण करून विद्यार्थ्यांनी राम नवमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Nanded Ram Navami Bike Rally : श्री रामनवमी निमित्ताने आज नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषदे तर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महावीर चौक ते अशोक नगर हनुमान मंदिर पर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत महिला वर्ग मोठया उत्साहात सहभागी झाला. तसेच भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा सह 2000 युवक या रॅलीत सहभागी झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन होत आहे. गुढीपाडव्याला या उत्सवाची सुरुवात होऊन रामनवमीला मोठा उत्सव संत गजानन महाराज मंदिरात संपन्न होत आहे. श्री रामनवमी निमित्त श्रींच्या मंदिरात आज रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.
Buldhana Ram Navami 2023 : बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात संत गजानन महाराज मंदिरात श्री राम जन्मोत्सव उत्सवाला सुरूवात झाली आहे. साडेपाचशे दिंड्यांसह दोन लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत. संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राम नवमीनिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राम नवमी उत्सवाचा मुख्य दिवस आज साजरा होत आहे. संत गजानन महाराज हयात असताना त्यांनी याठिकाणी राम नवमी उत्सवास प्रारंभ केला होता. त्यानुसार गुढी पाडव्याच्या दिवसापासून या उत्सवास प्रारंभ होतो. आजही रामनवमी उत्सव संत गजानन महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
Shirdi Ram Navami 2023 : राम नवमीनिमित्त राज्याबाहेरील साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. साईंच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज सकाळपासूनच दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत. आज दिवसभर ही गर्दी अशीच राहणार आहे. याचबरोबर सर्व भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थांनी घेतला आहे.
Nashik Ram Navami : नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे काळाराम मंदिरात रामजन्म सोहळ्याला हजेरी लावणार, साडेअकरा वाजता मंदिरात होणार दाखल
Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. रामनवमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस रामनवमी म्हणून मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगातील रावणाचा अत्याचार संपवण्यासाठी भगवान विष्णू यांनी मृत्युलोकात श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला. प्रभू श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी झाला. पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत राणी कौशल्या मातेच्या पोटी राजा दशरथाच्या घरी झाला. रामनवमी हा सण हिंदू धर्मात फार महत्त्वाचा आहे.
Nagpur Ram Navami : रामनवमीच्या शुभ पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या राम नगर येथील मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले.
Nashik Ram Navami : राम नवमी निमित्ताने (Ram Navami 2023) नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच दर्शन रांगेत भाविकांची गर्दी बघायला मिळत असून मंदिराबाहेर जवळपास तीनशे मीटर अंतरापर्यंत रांगा दिसून येतायत. रामनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून मंदिराच्या आवारात सुंदर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. गुढीपाडवा ते रामनवमी काळात येथे वासंतिक नवरात्रोत्सव देखील पार पडतो. आज पहाटे 5.30 वाजता काकडा आरती तर 7 वाजता महापुजा संपन्न झाली असून दुपारी बारा वाजता यंदाचे मानकरी समीर बुवा पुजारी ह्यांच्या हस्ते 12 वाजता रामजन्मसोहळा रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता 56 प्रकारचे नैवेद्य आणि महाआरती केली जाणार असून आज रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार आहे.
Nashik Ram Navami : रामनवमी निमित्ताने नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे. मंदिराबाहेर जवळपास तीनशे मीटर अंतरापर्यंत रांगा दिसून येता आहे. रामनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून मंदिराच्या आवारात सुंदर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. गुढीपाडवा ते रामनवमी काळात इथे वासंतिक नवरात्रोत्सव देखील पार पडतो, आज पहाटे 5.30 वाजता काकड आरती तर 7 वाजता महापूजा संपन्न झाली. दुपारी बारा वाजता यंदाचे मानकरी समीर बुवा पुजारी यांच्या हस्ते रामजन्मसोहळा रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता 56 प्रकारचे नैवेद्य आणि महाआरती केली जाणार असून आज रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही मंदिर परिसरात तैनात करण्यात आला आहे
Maharashtra Ram Navami 2023 : राज्यात रामनवमीचा उत्साह आहे. शिर्डी, शेगाव, पंढरपूर, आळंदीसह ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. त्यात मुंबईतल्या वडाळा राम मंदिरात देखील भाविकांची सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळतंय. वडाळ्याच्या राम मंदिरात रामनवमी निमित्तानं अनेक कार्यक्रमांच आयोजन देखील करण्यात आलं आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी अनेक भाविक वडाला राम मंदिरात आलेले आपल्याला पाहायला मिळतायत.
Mumbai Ram Navami : राज्यात रामनवमीचा उत्साह आहे. शिर्डी, शेगाव, पंढरपूर, आळंदीसह ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. त्यात मुंबईतल्या वडाळामधील राम मंदिरात देखील भाविकांची सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत आहे. वडाळ्याच्या राम मंदिरात रामनवमी निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी अनेक भाविक राम मंदिरात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
Buldhana Ram Navmi : आज चैत्र शुध्द नवमी अर्थात... श्री राम नवमी , शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राम नवमी उत्सवाचा मुख्य दिवस आज साजरा होत आहे. संत गजानन महाराज हयात असताना त्यांनी याठिकाणी राम नवमी उत्सवास प्रारंभ केला होता. त्यानुसार गुढी पाडव्याच्या दिवसापासून या उत्सवास प्रारंभ होतो. आजही रामनवमी उत्सव संत गजानन महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या असून आज सकाळी सात वाजता आरतीने रामनवमी मुख्य उत्सवास सुरूवात झाली आहे. दुपारी रथ, अश्वासह पालखीची नगर परीक्रमा असे दिवसभर अनेक कार्यक्रम मंदिरात होणार असून मुख्य आरती दुपारी बारा वाजता असेल. रामनवमी उत्सवसाठी जवळपास साडे पाचशे दिंड्या आणि दोन लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत. कोरोना नंतर पहिल्यांदाच यावर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात शेगावात साजरा होत आहे. राज्यासह शेजारील मध्यप्रदेश व गुजरात मधील भाविक ही शेगावात दाखल झाले असून आज योगायोगाने गुरुपुष्यामृत ही असल्याने दिवसभर शेगावात उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे.
चांदवड :आज श्रीराम नवमी... प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म दिवस... हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक सण म्हणजे रामनवमी होय. श्रीराम नवमी निमित्ताने सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नाशिकच्या चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूच्या सहाय्याने प्रभू श्रीराम चंद्राचे चित्र रेखाटून अनोखे अभिवादन केले आहे. खांद्यावर धनुष्यबाण, हातात खारुताई आणि चेहऱ्यावर प्रसन्न अशा छटा असलेले हे रंगीत खडूच्य सहाय्याने रेखाटलेले चित्र अतिशय सुंदर आणि लक्षवेधी ठरत आहे.
Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह साजरा केला जात आहे. यानिमित्त अयोध्येत आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. देशातील अनेक गावांना प्राचीन राम मंदिरांचा वारसा लाभला आहे. या मंदिरांवर देखील दृष्टीक्षेप टाकणं महत्वाचे आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यातील सातपाटी (Satpati) इथेही असेच एक प्राचीन राम मंदिर आहे. या राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा आहे.
Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह पाहायला मिळत आहे. यावर्षीची राम नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे. रामनवमीच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात साई नामाच्या जयघोषणानं परिसर दुमदुमून गेला आहे. आज पहाटे काकड आरतीपासूनच शिर्डीत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
पार्श्वभूमी
Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. रामनवमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस रामनवमी म्हणून मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगातील रावणाचा अत्याचार संपवण्यासाठी भगवान विष्णू यांनी मृत्युलोकात श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला. प्रभू श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी झाला. पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत राणी कौशल्या मातेच्या पोटी राजा दशरथाच्या घरी झाला. रामनवमी हा सण हिंदू धर्मात फार महत्त्वाचा आहे.
देशभरात रामनवमीचा उत्साह
आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह पाहायला मिळत आहे. यावर्षीची राम नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे. रामनवमीच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात साई नामाच्या जयघोषणानं परिसर दुमदुमून गेला आहे. आज पहाटे काकड आरतीपासूनच शिर्डीत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन
शिर्डीत (Shirdi) बुधवारपासूनच तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साईबाबा संस्थानच्या वतीने 29 ते 31 मार्च दरम्यान तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. साईबाबांची काकड आरती आणि पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज (30 मार्च) म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साई मंदिर (Sai Baba Temple) रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. रामनवमी उत्सवासाठी दरवर्षी राज्यभरातून शेकडो पालख्या (Palkhi) घेऊन साईभक्त पायी शिर्डीत येतात. यंदाही भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत.
शिर्डीमध्ये रेलचेल
साईबाबा हयात असताना हा उत्सव मोठा उत्साहाने साजरा करत होते. आजही साईसंस्थान आणी गावकरी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. तीन दिवस अनेक कार्यक्रमाची रेलचेल शिर्डीत असते. पंढरपूरप्रमाणे शिर्डीलाही अनेक पायी पालख्या येतात. यंदाही राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाचा गुजर करत खांद्यावर पालखी घेऊन नाचत गात अनेक भक्त शिर्डीत आल्याने रामनवमी उत्सवाला मोठी रंगत आली आहे.
श्री रामनवमी उत्सवानिमित्त शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात स्वाहाकार यागास प्रारंभ
दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन होत आहे. गुढीपाडव्याला या उत्सवाची सुरुवात होऊन रामनवमीला मोठा उत्सव संत गजानन महाराज मंदिरात संपन्न होत आहे. श्री रामनवमी निमित्त श्रींच्या मंदिरात 28 मार्च रोजी आध्यात्म रामायण स्वाहाकार यागास प्रारंभ झाला असून आज रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -