Nanded Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावासामुळं काही भागात जनजीवन  विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. नांदेड (Nanded) जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. काल रात्री नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे. तर हदगाव तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं विष्णुपुरी प्रकल्पाचे (Vishnupuri Dam) नऊ दरवाजे उघडले आहेत.


गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


नांदेड जिल्ह्यात काल जोरदार पाऊस बरसला आहे. हदगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं सखल भागातील रहिवाशी वस्तीतील घरात पाणी शिरल्याने नागरीकांची  चांगलीच तारबळ उडाली आहे. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. कंधार, हिमायतनगर, किनवट, माहूर, हदगाव या तालुक्यात मुसळधार पावसामुळं राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीचाही देखील खोळंबा झाला आहे. तर या मुसळधार पावसामुळं खेड्या-पाड्यांना  जोडणारे राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, तालुका मार्ग व अनेक छोटेमोठे रस्ते पाण्याखाली गेल्यानं रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. दरम्यान, अशा पुराच्या पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरून नागरिक धाडस दाखवत आहेत. जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. तर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली असून विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळं गोदावरी नदीकाठच्या गावांना  प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


राज्यात पावसाचा जोर कमी, मात्र आज मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट


हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. मात्र, कालपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. आर विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: