नांदेड : हिंगोली (Hingoli) येथील ओबीसी मेळाव्याला जाणाऱ्या मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ताफ्याला मराठा समाज बांधवांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. ओबीसी सभेसाठी भुजबळ काही वेळापूर्वी नांदेड (Nanded) येथील विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर, तेथून त्यांचा ताफा हिंगोलीच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, याचवेळी मराठा आंदोलकांकडून भुजबळ यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे, पोलिसांनी तात्काळ धाव घेत तीन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तर भुजबळ यांचा ताफा हिंगोलीच्या दिशेने निघाला आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आज हिंगोलीत ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासाठी भुजबळ नांदेड येथील विमानतळावर पोहचले असून, त्यांचा ताफा हिंगोलीकडे निघाला आहे. मात्र, याचवेळी मराठा आंदोलकांनी भुजबळ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून विरोध करण्याचा प्रयत्न केला. तसेच, घोषणाबाजी देखील केली. मात्र, आधीपासूनच तैनात असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिघांना ताब्यात घेतले. तसेच, त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर, भुजबळांचा ताफा आता हिंगोलीच्या सभेच्या दिशेने रवाना झाला आहे.
छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक
एकीकडे भुजबळ यांच्या ताफ्याला नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला असून, दुसरीकडे त्याच नांदेडमधील हिमायतनगरमध्ये छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करण्यात आला आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर आज होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला हिमायतनगर शहरातील हजारो ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहे. दरम्यान, शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करण्यात आले. तसेच यावेळी 'हमारा नेता कैसा हो, छगन भुजबळ जैसा हो, जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा, अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यानंतर हजारो कार्यकर्ते सभेसाठी रवाना झाले आहेत.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
हिंगोली येथील सभेला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सोबतच, सभेसाठी येणाऱ्या मार्गावर देखील पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच, सभेच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून, त्या माध्यमातून पोलीस सभेवर लक्ष ठेवत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: