नांदेड : पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराचा प्रश्न ऐरणीवर असताना आता मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांनी (Sugarcane Farmers) एल्गार पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यातील (Nanded) शेतकऱ्यांनी  प्रति टन 3500 रूपयांचा पहिला हप्ता मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच  मागील वर्षीचे प्रति टन 200 रूपये त्वरित मिळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा (Farmers Morcha) भाऊराव चव्हाण साखर कारखान्यावर लवकरच धडकणार आहे. 


नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे  ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण साखर कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. आजच्या घडीला केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवित आहे. तर शेतकऱ्याचं हित जोपासणारे सहकारी तत्वावर चालणारे कारखाने आणि संस्था हे राजकारण्यांसाठी कुरण बनले आहेत. आजचे सहकार क्षेत्र सरकारची दासी म्हणून काम करीत आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी दिली.


ऊसाला पहिला हप्ता 3500 हजार द्यावा यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोयता बंद केला आहे. अनेक कारखान्याचे गाळपही अडचणीत आलं आहे. त्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकरीही आता या आंदोलनात उतरणार असल्याने नेमका ऊस दर आणि पहिल्या हप्त्या संदर्भात काय तोडगा निघतो. याकडे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच लक्ष्य लागलं आहे.


ऊसदरासाठी राजू शेट्टी आक्रमक 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गेल्या दोन महिन्यांपासून तुटलेल्या ऊसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात 3500 रुपयांच्या दरासाठी प्रखर आंदोलन सुरु आहे. मात्र, सरकारी पातळीवर या आंदोलनाची कोणतीही दखल अजून घेण्यात आलेली नव्हती. स्वाभिमानी पुणे बंगळूर महामार्गावर कोल्हापुरात बेमुदत चक्काजामचा इशारा दिल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र, सरकारी पातळीवर आज मंत्रालयात बैठक होऊनही कोणताच तोडगा निघालेला नाही.  यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनीही आता काय व्हायचं ते होऊन जाऊ दे आता म्हणत रणशिंग फुंकले आहे. त्याचबरोबर त्यांनी मधला मार्ग देत चर्चेचा मार्गही मोकळा ठेवला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :