Agriculture News : हळदीला (Turmeric) मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे नांदेडमध्ये (Nanded) हळद लागवडीच्या (Turmeric Cultivation) क्षेत्रात यंदा घट दिसून येत आहे. एरव्ही सिंचनाची सोय असलेले शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यातच हळद लागवड करत असतात. मात्र, यंदा लांबलेला मॉन्सून आणि गतवर्षी हळदीला मिळालेला अत्यल्प भाव यामुळं हळद लागवडीत फारसे शेतकरी उत्सुक नसल्याचे चित्र दिसत आहे.


यंदा हळदीला केवळ प्रति क्विंटल पाच ते सात हजारांचा भाव 


सध्या राज्यातील शेतकरी मान्सूनकडे डोळे लावून बसला आहे. कारण सध्या शेती पिकांसाठी पाण्याची खूप गरज आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. मात्र, पावसानं ओढ दिल्यानं बळीराजा चिंतेत आहे. यंदा लांबलेला मॉन्सून आणि गतवर्षी हळदीला मिळालेला अत्यल्प भाव यामुळं नांदेड जिल्ह्यात हळद लागवडीत मोठी घट झाली आहे.  खर्चिक आणि भरपूर अंगमेहनत घेत हळदीचे पीक घ्यावे लागते. मात्र, यंदा हळदीला केवळ प्रति क्विंटल पाच ते सात हजारांचा भाव मिळाला आहे. त्यामुळं हळद लागवडीच्या क्षेत्रात घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


पेरणीयोग्य पाऊल नसल्यानं पेरण्या खोळंबल्या


दरवर्षी मृग नक्षत्रामध्ये पेरणीला सुरुवात होत असते, परंतु यावर्षी अजूनही पेरणी योग्य पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत. राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली असली तरीही अजून शेतीसाठी पुरक असा पाऊस राज्यात बरसला नाही. हवामान खात्याने देखील जोपर्यंत 50 ते 60  टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.  


बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर 


मराठवाडा आणि विदर्भामध्ये दरवर्षी मृग नक्षत्रांमध्ये पेरणी करण्यात येते. परंतु या वर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. राज्यात पावसाच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण केली होती. तसेच हळदी आणि सोयाबिन पिकांसाठी शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी पूर्ण केली होती. पंरतु मान्सूनने अजूनही योग्य प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे आता पेरणी कशी करायची असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.एक ते दिड महिन्यांपासून शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी आता मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत.


हवामान खात्याने यंदा लवकर आणि वेळेत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील हजारो रुपये खर्च करुन  पेरणासाठी लागणाऱ्या बियाणांची खरेदी केली होती. परंतु अद्यापही योग्य प्रमाणात पाऊस पडला नसल्यामुळे पेरणी वेळेवर होणार की नाही असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.