नांदेड : हिंदू धर्मातील पवित्र श्रावण मास सुरु असल्याने भाविकांची शिवंदिरात मोठी गर्दी दिसून येत आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवमंदिरात भाविक दर्शनासाठी जात असतात. तर, अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजा, शिवकथा आणि शिवपुराण कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. नांदेडमध्येही अशाच शिवपुराण महाकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी, देशातील नामवंत कथाकार प्रदीप मिश्रा यांचे नांदेडमध्ये आगमन होणार होते. मात्र, नांदेडमध्ये 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी धुव्वादार पाऊस झाला, याचा पावसाचा फटका येथील शिवपुराणकथेला बसला आहे. पंडित प्रदिप मिश्रा यांची आजपासून शिवकथा ही नांदेड येतील मोदी मैदानात आयोजित करण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्याने ही कथा रद्द करण्यात आली असून आता ऑनलाइन पद्धतीने हा शिवपुराण कथासोहळा पुढील दोन दिवस संपन्न होणार आहे. 


नांदेडमध्ये (Nanded) झालेल्या धो धो पावसामुळे (Rain) सभा मंडपात सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. जवळपास 20 हजार लोक हे याच मंडपात मुक्कामी होते, सगळीकडे पाणी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सजगता दाखवत येथील सर्व भाविकांना सुखरूप स्थळी हळविलं आहे, या सर्वच भाविकांना शहरातील मंगल कार्यलयात ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून जवळपास 250 गाड्यामधून सर्व भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यासंर्भात आता कथाकार प्रदीप मिश्रा आणि खासदार अशोक चव्हाण यांनीही माहिती दिली. रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका हा शिवपुराण कथेला बसला असून मंडपात सगळीकडे पाणी झाल्यामुळे आज दुसऱ्या दिवशी कथा होणार नसल्याचे स्वतः कथाकार प्रदीप मिश्रा (Pradeep Mishra) यांनी सांगितले. मंडपात पाणी असल्याने सर्व भक्तांना आवाहन करत आहे की, आज कथा होणार नाही, लोकांना बसायला जागा नाही. त्यामुळे, सर्वांनी आस्था चॅनेलवर आज कथा ऐकावी, असे कथाकार मिश्रा यांनी आवाहन करताना म्हटले आहे. 


अशोक चव्हाण यांचेही आवाहन


नांदेड येथे काल सायंकाळनंतर प्रचंड पाऊस झाल्याने पं. प्रदीपजी मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथा सोहळ्याच्या स्थळी पाणी साचले होते. जिल्हा प्रशासन व आयोजकांनी तत्परतेने भाविकांना सुरक्षितस्थळी हलवले. त्यासाठी मी प्रशासन व आयोजकांच्या टीमचे अभिनंदन करतो. कार्यक्रमस्थळाची सध्याची स्थिती गैरसोयीची असल्याने पुढील दोन दिवस महाशिवपुराण कथा ऑनलाईन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सर्व भाविकांना माझे आवाहन आहे की त्यांनी जिल्हा प्रशासन व आयोजकांच्या सूचनांचे पालन करून त्यांना सहकार्य करावे, असे ट्विट खासदार अशोक चव्हाण यांनी केलंय.


हेही वाचा


लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका, 'लाडकी बहीण योजने'बाबतही राज ठाकरेचं मोठं विधान