मुंबई: शेतकऱ्यांना आंदोलनासाठी मैदानात उतरावं लागावं हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
शेतकरी आंदोलन जितकं दाबण्याचा प्रयत्न होईल तितकं ते जास्त उफाळून येईल, असा इशारा नानांनी दिला.
तसंच शेतकऱ्यांची एकच संघटना असावी, त्यांनी एकत्र येऊन एका छत्राखाली संघर्ष करावा, अशी अपेक्षा नानाने व्यक्त केली.
फडणवीस सरकारला हात जोडून विनंती करतो, शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मान्य करा, असं नाना म्हणाले.
शेतकरी आणि समाजातील इतर स्तरांमध्ये जी आर्थिक दरी आहे ती दूर करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावा. तसंच सक्षम लोकांनी स्वत:हून पुढे येऊन कर्जमाफी नाकारली पाहिजे, असं मत नाना पाटेकरांनी व्यक्त केलं.
'नाम' फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करणारे अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शेतकरी संपावर भाष्य केलं.
कलावंतांनी राजकारणात जाऊ नये, असा सल्ला नाना पाटेकरांनी दिला.