विरार: व्हॉट्सअॅप हे आजच्या जगात सर्वात सुपरफास्ट संवादाचं माध्यम बनलं आहे. याच व्हॉट्सअॅपवरुन अनेक माहिती, विनोद, व्हिडीओ, फोटो फॉरवर्ड केले जातात.

असं असलं तरी अनेकांनी व्हॉट्सअॅपचा  दुरुपयोग केल्याचंही समोर आलं आहे. मात्र पोलिसांनीही व्हॉट्सअॅपचीच मदत घेऊन एका आरोपीला पकडलं आहे.

मुंबईजवळच्या मीरा रोड पोलिसांनी एका अट्टल ठगाला व्हॉट्सअॅप डीपीवरुन शोधून, गजाआड केलं आहे. राजीव हसमुखभाई भट असं या आरोपीचं नाव आहे.

या ठगाने मागील दोन वर्षात मीरा-भाईंदर शहरात वयोवृध्द नागरिकांना टार्गेट करून, एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदलून, अकाऊंटमधील हजारो रुपये लाटले आहेत.

या आरोपीने मीरा-भाईंदरसह मुंबई आणि राजस्थान इथेही सामान्य एटीएम धारकांना गंडा घातल्याचं उघड झालं आहे.

राजीव भट हा काशीमीराजवळच्या काशीगावातील हेल्मेट टॉवर इथे राहतो. तो मूळचा गुजरातमधील गोलवाडचा रहिवासी आहे.

24 मार्च 2017 रोजी 65 वर्षाचे माजी सैनिक भिकाजी राजाराम कदम स्टेट बँक ऑफ इंडियातून पेन्शन काढण्यासाठी गेले होते. त्यांना एटीएमची माहिती कमी असल्याचे लक्षात येताच, राजीव भटने त्यांना पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाना केला.

राजीव भटने आधी त्यांचा पिन नंबर मिळवला, मग हातचलाखी करुन त्यांचं एटीएम कार्ड आपल्याकडे घेऊन, आपल्याकडील कार्ड त्यांना दिलं. मग कदम निघून जाताच, राजीव भट 40 हजार रुपये काढून पसार झाला.

याबाबत मीरा रोड पोलीस ठाण्यात अनोळखी इसमावर गुन्हा दाखल झाला होता.

मीरा-भाईंदर परिसरात दोन वर्षापासून अशाच प्रकारच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत जात होते. या गुन्ह्याचे स्वरुप पाहता एकच जण हे गुन्हे करत असल्याचे उघड झाले होते.

मोबाईल लोकेशनवरून आणि खबऱ्याकडून पोलिसांनी आरोपीचे नंबर ट्रेस केले. ते नंबर पोलिसांनी व्हॉट्सअपवर तपासले. व्हॉटसअपचा डीपी आणि एटीएमच्या सीसीटीव्हीतील चेहरा एकच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून, आरोपीच्या मुसक्या आवळल्या.  मुंबईतील एका लेडीज बारमधून राजीव भटला ताब्यात घेण्यात आलं.

आरोपीवर मीरा-भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात एक, भाईंदर पोलीस ठाण्यात दोन, नयानगर पोलीस ठाण्यात सहा, काशिमिरा पोलिस ठाण्यात एक,  मिरारोड पोलीस ठाण्यात दोन असे बारा गुन्हे दाखल आहेत.

शिवाय मुंबईमधील समता नगर, बोरिवली, दहिसर, वसई, नालासोपारा आणि राजस्थानातील उदयपूर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे.

हा केवळ चैनीसाठी चोरी करत असल्याचंही उघड झाले आहे.

एटीएममधून पैसे काढताना, प्रत्येक नागरिकांनी सावध राहावे, अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम देऊ नये, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.