नवी दिल्ली : एचडीएफसी बँक 10 जुलैपासून UPI वरुन होणाऱ्या व्यवहारावर शुल्क आकारण्यास सुरुवात करणार आहे. एचडीएफसी बँकेने त्यासंदर्भातील ईमेल काही खातेदारांना पाठवले आहेत.

1 रुपया ते 25 हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 3 रुपये (अतिरिक्त शुल्क) आकारले जातील, तर 25 हजार 1 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 5 रुपये (अतिरिक्त शुल्क) आकारले जातील. 10 जुलैपासून UPI वरील व्यवहारांवर शुल्क आकारण्यास सुरुवात केली जाईल, अशा आशयाचे ईमेल एचडीएफसी बँकेने ग्राहकांना पाठवले आहेत. आता एचडीएफसी बँक प्रत्यक्षात असा शुल्क आकारण्यास सुरुवात करते का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

एचडीएफीस बँक ही खासगी क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे एचडीएफसीच्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे.

कॅशलेस इकॉनॉमीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने बँक व्यवहार अधिकाधिक ऑनलाईन करण्यासाठी गेल्या वर्षापासून पावलं उचलली. त्याअंतर्गत केंद्र सरकारने UPI पेमेंट सर्व्हिस सुरु केली. या माध्यमातून दोन बँकांमध्ये अॅपच्या मदतीने पैशांची देवाण-घेवाण करणं शक्य झालं.

यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारण्यासंबंधित ईमेल एचडीएफसीने ग्राहकांना पाठवलं आहे. त्यामुळे इतर बँकाही अशाप्रकारे शुल्क आकारणार आहेत का, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, जर बँकांनी अशाप्रकारे शुल्क आकारण्यास सुरुवात केली, तर लोक पुन्हा रोख रकमेच्या व्यवहाराकडे वळतील, एवढं निश्चित.

यूपीआय वापरावर शुल्क आकारु नये यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) देशातील बँकांना आवाहन करण्याची शक्यता आहे. कारण शुल्क आकारल्यास कॅशलेस इकॉनॉमीच्या स्वप्नाला खीळ बसेल. NPCI ही देशातील डिजिटल पेमेंटसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते.