नागपूर : महाराष्ट्रवासी कोरोनाशी लढण्यात आणि लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले व्यवसाय, उद्योग सावरण्यात व्यस्त असताना राज्याने एक महत्वाची केंद्रीय संशोधन संस्था गमावली आहे. नागपुरात असलेली राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा आता अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये विलीन करण्यात आली आहे. दुर्दैव म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने यासंदर्भात दमदारपणे आवाज उठवलेला नाही. त्यामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर मध्य भारतातील लाखो खाण कामगारांसाठी त्यांच्या आरोग्याशी निगडीत महत्वाचे संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेने नागपुरातील त्यांचे कार्यालय आणि प्रयोगशाळा गुंडाळत अहमदाबादची वाट धरली आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा तसेच शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विस्तारलेले खाणकाम उद्योग आणि त्याच्याशी संबंधी लाखो मजुरांच्या आरोग्यासाठी मोलाचे संशोधन करण्यासाठी 2002 मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था नागपुरात असणे आवश्यक असल्याचे ओळखले होते. तेव्हा कर्नाटकातील कोलारमधून राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था नागपुरात स्थलांतरित केली गेली होती. तेव्हा खाणकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो मजुरांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर संशोधन करून त्याबद्दल उपाय शोधण्यासाठी नागपुरात एक अद्ययावत प्रयोगशाळा ही उभारली गेली होती. तेव्हा पासून राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि त्याची अद्ययावत प्रयोगशाळा खाणीत काम करणारे मजूर आणि खाणीच्या अवतीभवती राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या जीवनाला सुसह्य बनवण्यासाठी महत्वपूर्ण कामे करत होती.
खाणीमध्ये काम करणारे कामगारांच्या आरोग्यावर तिथल्या वातावरणाचे, ध्वनी-वायू-जल प्रदूषणाचे, हवेतील धूलिकण आणि जमिनीतील कंपनाचे काय परिणाम होतात. खाणीच्या लगतच्या क्षेत्रात ध्वनी-वायू-जल प्रदूषणाचे, हवेतील धूलिकण आणि जमिनीतील कंपनाचे तिथल्या सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात हे तपासण्याचे काम गेली अनेक वर्षे ही राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेची नागपुरातील प्रयोगशाळा करत होती. त्यामुळे खाणी मध्ये काम करणारे आणि खाणीलगत राहणाऱ्या लाखो लोकांच्या आरोग्यासंदर्भात दर्जेदार संशोधन होऊन त्यावरील उपाय शोधले जात होते. मात्र, 2019 मध्ये अचानक केंद्र सरकारने राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेला तिच्या प्रयोगशाळेसह अहमदाबाद येथील नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थ या संस्थेत विलीन करण्याचे ठरविले. त्यांसदर्भात जुलै 2019 मध्येच केंद्रीय कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आले होते. मात्र, अनेक महिने उलटून ही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्रातील या महत्वाच्या संस्थेला राज्याबाहेर नेणार नाही असे वाटत होते.
मात्र, मार्चनंतर संपूर्ण देश कोरोना संदर्भातील लॉकडाऊनमध्ये अडकला. तेव्हा अत्यंत हळुवारपणे नागपुरातील वाडी परिसरातून या महत्वपूर्ण संशोधन संस्थेचे कार्यालय आणि प्रयोगशाळा गुंडाळण्याचे काम सुरु झाले. हळूहळू एकेक यंत्र आणि कार्यालयीन साहित्य गुजरातला पाठवले गेले आणि जुलै महिन्यात या संस्थेने नागपूरला कायमचे रामराम करत गुजरातची वाट धरली. खाण उद्योग प्रामुख्याने विदर्भात आणि मध्य भारतात असताना, खाणीचे पर्यावरणीय व इतर दुष्परिणाम इथले नागरिक भोगत असताना खाण कामगारांच्या, खाणी लागत निवास करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्यांचा संशोधन अहमदाबादमध्ये बसून कसे करता येणार असा प्रश्न राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेत कधीकाळी सल्लागार म्हणून काम केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ अंजली साळवे विटणकर यांनी विचारला आहे.
डॉ अंजली साळवे विटणकर यांनी महाराष्ट्रातील ही संस्था राज्याबाहेर जाऊ नये यासाठी गेल्या अनेक महिन्यात लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत त्यांना राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेचे महत्व सांगितले होते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, खाण उद्योग प्रामुख्याने असलेल्या चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर्वानाच माहिती दिली. मात्र, आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. काहीनी साप निघून गेल्यानंतर काठी आपटण्याचे काम सुरु केले असून खाण कामगारांचा जिल्हा असलेल्या चंद्रपुरातील खासदार बाळू धानोरकर यांनी राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था महाराष्ट्रातून बाहेर नेणे हे महाराष्ट्रावर अन्याय असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था महाराष्ट्रातच राहावी यासाठी 2019 मध्ये आपण संसदेत आवाज उठवला होता. आता ही महाराष्ट्राच्या या संस्थेला परत मिळवण्यासाठी लढा देणार असल्याचे धानोरकर म्हणाले.
विशेष म्हणजे या पूर्वी ही महाराष्ट्रातील काही संस्था गुजरात आणि इतर राज्यात स्थलांतरित केल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाखाली काही दिवस आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करण्यापलीकडे फार काही झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील उद्योग आणि कामगारांसाठी महत्वाच्या संशोधन संस्था एकेक करून इतर राज्यात नेल्या जात असल्याचे दुर्दैवी चित्र महाराष्ट्रवासीयांना पाहायला मिळत आहे. आता राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेचे विलीनीकरण नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ या संस्थेत झाल्यामुळे किमान त्याचे एक क्षेत्रीय कार्यालय नागपुरात स्थापन करावे अशी मागणी खाण कामगारांनी केली आहे.