Teachers Constituency Election Result Nagpur Division : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे.  महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. देवेंद्र फडणवीस  आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर मतदार संघात भाजप पुरस्कृत नागो गाणार यांचा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्याच गृह जिल्ह्यात धक्का बसला आहे. महाविकास आघाडीनं अपक्ष सुधाकर अडबालेंना पाठिंबा दिला होता. अडबाले यांना 55 टक्के मते मिळाली आहेत. त्यांच्या अधिकृत विजयाची अद्याप घोषणा झालेली नाही. पण काँग्रेस कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष सुरु झाला आहे. 


सुधाकर अडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने त्यांची उमेदवारी संघटनेमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन अनेक महिन्यांपूर्वी जाहीर केली होती.. त्यामुळे ते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे एकमताने निवडलेले उमेदवार होते.. त्यांना त्यांच्या संघटनेतून कुठेच विरोध नव्हता


विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 34 हजार 360 पत्रिकांपैकी 28 हजार मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतामधील एक हजार 99 मते अवैध ठरली तर 26 हजार 901 मते वैध होती. 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी 19 जणांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. 


सुनील केदार यांची चाल यशस्वी  - 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देत सुनील केदार व विजय वडेट्टीवार यांनी रेटलेल्या सुधाकर अडबाले यांच्या विजयी वाटचालीनंतर  नागपूरमध्ये नाना पटोले गट बॅकफूटवर गेला आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वेळेस छोटू भोयर यांच्या वेळेस झालेली नाचक्की टाळण्यासाठी स्थानिक काँग्रेसी नेत्यांनी शिक्षक निवडणुकीत  दबाव गट तयार केला होता. त्याच दबाव गटामुळे सुधाकर अडबाले यांच्या विजय सोईस्कर झाल्याचे बोलले जात आहे. 


विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल - 


नागपूरमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र नागपुर मध्ये का नाही चालली ? "दया कुछ तो गडबड है" असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले त्यांचें व दुसरीकडे नागपूरचे वैभव रेशीमबागसंघ कार्यालय, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन, असेही ट्वीट मिटकरी यांनी केले आहे. त्याशिवाय, इतर नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.