Teachers Constituency Election Result Nagpur Division : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात मतमोजणी सुरु झाल्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार आघाडीवर आहेत. अलिकडेच प्राप्त आकडेवारीनुसारही इतर उमेदवारांपैकी चांगलीच आघाडी असल्याने महाविकास आघाडीतर्फे मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोषाला सुरुवात झाली आहे. मात्र भाजप समर्थिक उमेदवार नागो गाणार हे आतापर्यंत प्राप्त मतांनुसार  दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असल्याने भाजप नेत्यांची धाकधूक वाढली असल्याचे चित्र आहे. तसेच गेल्या वर्षी झालेल्या नागपूर (Nagpur) पदवीधर निवडणुकीप्रमाणे यावेळी नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे (Election) निकाल धक्कादायक लागतात की काय, असे चित्र सध्यातरी तयार झाले आहे. 


कोटा पूर्ण होणार?


महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 28 हजार मतांची मोजणी झालेली आहे. त्यांपैकी सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांना 14 हजार 71 मते मिळालेली आहे. एकूण मतांपैकी निम्मी मते एकट्या सुधाकर अडबाले यांनी घेतलेली आहेत. आतापर्यंत 14 हजार मतांचा लीड म्हणजे अडबालेंच्या विजयाची खात्री दिली जात आहे. विजयासाठी आवश्‍यक असलेल्या मतांचा कोटा अद्याप ठरला नसला तरी अडबाले हा कोटा पूर्ण करतील, असे सांगितले जात आहे.


30 टक्के मते घेतली तरी....


वैध मतांची पूर्ण मोजणी झाल्यानंतर कोटा ठरणार आहे. अजून सुमारे सहा हजार मते मोजायची शिल्लक आहेत. या मोजणीत अडबाले मागे जातील, असे दूरवर कुठेही दिसत नाही. आतापर्यंतच्या 28 हजार मतांचा ट्रेंड बघितला तर उर्वरित 6 हजार मतांपैकी किमान 30 टक्के मते जरी त्यांनी घेतली. तरीही त्यांचा विजय दृष्टिपथात दिसतो. त्यामुळे अडबालेंच्या समर्थकांमध्ये आनंदाला उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.


भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता!


या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार निवडून आल्यास भाजपसाठी ती धोक्याची घंटा ठरणार आहे. कारण गेली 12 वर्षे येथे आमदार म्हणून नागो गाणार होते आणि आताही हा मतदारसंघ भाजपचाच गड आहे, असे सांगितले जात होते. पण आजचा निकाल अडबालेंच्या बाजूने लागला तर पदवीधरप्रमाणे भाजपचा हा गड सुद्धा उद्ध्वस्त होणार असल्याचं दिसत आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीतही भाजपला विजयाची पूर्ण खात्री होती. पण महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र येऊन लढले आणि भाजपचा पार धुव्वा उडवला होता. आज त्याची पुनरावृत्ती होते का, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


ही बातमी देखील वाचा...


Cyber Attack : सैन्यासाठी 'ग्रेनेड्स' बनविणाऱ्या नागपुरातील सोलर समूहावर सायबर हल्ला; संवेदनशील डेटा चोरी, तपास CBI कडे?