Yadikar Punjabrao Chavan on Dhananjay Munde : राज्यात मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याच गॅझेटचा आधार घेत बंजारा समाजाकडून एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातील आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. बीड, जालना व इतर जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार आंदोलने केली जात आहेत. बीडमध्ये देखील काल भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलेल्या “बंजारा आणि वंजारी एकच आहेत” या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.

Continues below advertisement

‘याडीकार’ पंजाबराव चव्हाण यांचा तीव्र विरोध

बंजारा समाजातील ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध ‘याडी’ कादंबरीचे लेखक पंजाबराव चव्हाण (Yadikar Punjabrao Chavan) यांनी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर कडाडून आक्षेप घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बंजारा आणि वंजारी समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक मूल्य वेगळे आहेत आणि या दोन समाजांची तुलना करणे चुकीचे व अन्यायकारक आहे.

धनंजय मुंडे यांचं वक्तव्य चुकीचं

पंजाबराव चव्हाण म्हणाले की, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. वंजारींचे सामाजिक, सांस्कृतिक मूल्य बंजारापासून वेगळे आहे. बंजारा आणि वंजारी यांच्यात रोटी, बेटी व्यवहार नाही. दोन्ही जातींच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत. वंजारी आणि बंजारा यांचा पेहराव वेगळा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी चुकीचे वक्तव्य करून बंजारा समाजाचा एसटीमधील आरक्षणाचा लढा कमकुवत करू नये.  बंजारा आदिम संस्कृती पाळणारे आहेत, ते मूळनिवासी आहेत. तसेच बंजारा समाज पाड्यावर राहणारा असून वंजारी गावांमध्ये स्थिरस्थावर झालेले आहे. वंजारी समाजाचे देव वेगळे आहे, त्यांच्या चालीरिती, रुढीपरंपरा बंजारा समाजापासून वेगळ्या आहेत. सण साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे. बंजारामध्ये नसाब प्रथा पाडली जाते, वंजारीमध्ये ती नाही. केंद्र सरकारच्या आदिवासीसाठीचे पाचही निकष बंजारा समाज पूर्ण करतो. मात्र वंजारी त्या अटी पूर्ण करत नाही. त्यामुळे बंजारा आणि वंजारी एक होण्याचा कुठलाही प्रश्नच नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

Continues below advertisement

बंजारा आणि वंजारी समाजामध्ये वाद निर्माण करू नये 

पंजाबराव चव्हाण पुढे म्हणाले की, भटके जीवन जगणाऱ्या बंजारा समाजाने इंग्रजांच्या काळापासून खूप भोगले आहे. इंग्रजांच्या 1931 च्या जनगणनेमध्ये बंजारा शेड्युल ट्राईब्स म्हणजेच आदिवासीमध्ये समाविष्ट होते. सरकारच्या इदाते आयोगाने बंजारा समाजाची शेड्युल ट्राईब्समध्ये समावेशासाठी शिफारस केली आहे. त्यामुळे बंजारा आणि वंजारी एक होण्याचा कुठलाही आधार नाही. वंजारी समाजाचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांनी काहीही वक्तव्य करावे. मात्र त्यांनी बंजारा आणि वंजारी समाजामध्ये वाद निर्माण करू नये आणि बंजारा समाजाचे अशा पद्धतीने नुकसान करू नये. 

आमचा लढा कमकुवत करू नये

महानायक वसंतराव नाईक यांनी बंजारा समाजाला दिलेल्या चार टक्क्यांच्या आरक्षणामध्ये धनंजय मुंडे यांनी बिलकुल उडी घेऊ नये चुकीचे वक्तव्य करू नये. 80 वर्षांपूर्वीपासून बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. मनोज जरांगे यांच्या हैदराबाद गॅझेटच्या विषयामुळे बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आम्ही धन्यवाद देतो. मात्र, असे असताना बंजारा - वंजारी वाद निर्माण करून कोणीही आमचा लढा कमकुवत करू नये. या वादात कोणी नाहक घुसू नये, असे म्हणत पंजाबराव चव्हाण यांनी धनंजय मुंडेंना सुनावले. 

आणखी वाचा 

Dhananjay Munde on Banjara: बंजारा आणि वंजारी वेगवेगळे आहेत का, धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने ठिणगी, बंजारा तरुण संतापले, धनूभाऊ म्हणाले...