मुंबई : महायुतीमध्ये अनेक नेत्यांची गर्दी झाली असून त्यामुळे भाजपच्या अनेकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही, आशिष देशमुखही (Ashish Deshmukh) त्यापैकीच एक असून ते आता पु्न्हा काँग्रेसकडे उमेदवारी मागत असल्याचं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वीच भाजपमध्ये गेलेले आशिष देशमुख पुन्हा काँग्रेसचा हात धरणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आशिष देशमुखांच्या घर वापसीच्या शक्यतेवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीमध्ये नेत्यांची गर्दी झाली आहे. अनेकांना त्यांची जागा सुरक्षित वाटत नाही. त्याची मोठी यादी आहे. उपऱ्यांना उपरेगिरी सुचते. आशिष देशमुख स्वतः मागील दारातून आम्हाला भेटून जात आहे, काँग्रेसकडे उमेदवारी मागत आहे. हा हवश्या, गवश्या, नवश्या आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकेचा भडीमार केला. आशिष देशमुख हे विधानसभेसाठी इच्छुक असून सावनेर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी असल्याची चर्चा आहे. विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर आता भाजप त्याला काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठीच पवारांनी तुतारी घेतली
शरद पवार यांनी तुतारी वाजवण्यासाठीच घेतली आहे. तुतारी वाजवून, मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठी चिन्ह घेतले असावे. तुतारी आणि मशाल हे दोन्ही चिन्हे हाताळण्यासाठी हात लागतोच. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांचा सत्ताधाऱ्यांविषयीचा रोष दिसून येईल.
प्रकाश आंबेडकर सोबत येतील याची खात्री
विजय वडेट्टीवार म्हणाले की, वंचितला सोबत घेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. ते जिथे म्हणतील तिथे चर्चा करण्याची आमची तयारी आहे. मला विश्वास आहे की प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील. अजून ही महाविकास आघाडीच्या बैठकीची तारीख ठरलेली नाही. बैठक निश्चित झाल्यावर प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिला जाईल.
ही बातमी वाचा :