नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) विदर्भात होत असताना विदर्भातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. पुढील दोन दिवस विधीमंडळाचे कामकाज वाढवून या दिवसात फक्त आणि फक्त विदर्भातील प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची आग्रही भूमिका होती. मात्र निव्वळ बहुमताच्या जोरावर सरकार हे अधिवेशन बुधवार 20 डिसेंबरला संध्याकाळी गुंडाळायचा निर्णय घेत आहे. सरकारला विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा करायची नाही. विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचं, इथले प्रश्न त्यांना सोडवायचे नाही अशीच सत्ताधाऱ्यांची मनिषा आहे. एकप्रकारे हा विदर्भातील जनतेवर अन्याय करण्याचे पाप हे सरकार करत आहे असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर केला. ते नागपुरात बोलत होते.  


आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत आम्ही विधीमंडळ सत्राचे कामकाज आनखी दोन दिवस वाढवावे आणि विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करावी या बाबत आग्रही भूमिका मांडली. मात्र सरकार आपल्या बहुमताचा गैरवापर करत अद्याप विदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले आहे. या दुर्दैवी निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो. निषेध करतो. असे असले तरी उद्या आम्ही आमची मागणी सभागृहात लावून धरणार असल्याचे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले. 


आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार


आरोग्य विभागाच्या एकूण भ्रष्टाचाराच्या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा झाली. त्यामध्ये बोलताना आरोग्य विभागातील भ्रष्टाचार आम्ही उघड केला. प्रचंड  भ्रष्टाचार आरोग्य विभागामध्ये चाललेला असून बदल्यांचे  रॅकेट सध्या सुरू असल्याचे चित्र आहे. पैसे घेतल्याशिवाय बदल्याचं होत नाही. नियम डावलून पदोन्नती केले जाते. म्हणजे ज्युनिअर माणसाला सहसंचालक पदापर्यंत नेण्याचे प्रकार होत आहेत. एकतर नागपूरच्या उपसंचालकाची बदली पहिल्यांदा केली आणि दुसऱ्या दिवशी ती बदली रद्द केली. त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार संबंधित खात्याने आणि मंत्र्यांनी केला असे अनेक विषय या आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत घडत असून संपूर्ण भट्ट्याबोळ करण्याचं काम झालं आहे. एकंदरीत खूप मोठ्या प्रमाणात आरोग्य खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. 


बदल्यांच्या नावाने  भ्रष्टाचाराचा पाऊस


आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहेत. जवळपास 1200 डॉक्टरांची बदली ही नियमबाह्य केली आणि प्रत्येकी 4 लाख रुपये त्या ठिकाणी घेतल्या गेल्याचा माहिती आमच्याकडे आहे. जवळपास 50 कोटी रुपये या बदल्यामध्ये वसूल केले गेलेत. दोन संचालकाची पद बोली लावून रिक्त ठेवली आहे. म्हणजे जो जास्त पैसे देईल त्यासाठी ती पद रिक्त आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आरोग्य खात्याच्या संचालकांची दोनही महत्वाची पद रिक्त राहावीत हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे या संवेदनशील खात्याकडे केवळ भ्रष्टाचाराची संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. आरोग्य विभागामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलची परमिशन द्यायचे, तर तीस ते पस्तीस लाख रुपये मोजल्याशिवाय देत नाही. या आरोग्य सुविधा  लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे, की या खात्याच्या लोकांचं पोट भरण्यासाठी आहे. खूप मोठ्या भ्रष्टाचाराचा पाऊस या ठिकाणी चालू आहे. यांना ना लोकप्रतिनिधीचा, ना कोणाचा धाक राहिलेले नाही. असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.