नागपूर :  नागपुरातील (Nagpur) काटोल तालुक्यातील चाकडोह, बाजारगाव येथे असलेल्या सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीत झालेल्या स्फोट (Nagpur Blast) प्रकरणी तपास कामाला वेग आला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू आहे.  


या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दहशतवादी कृत्याच्या दिशेनेही या स्फोटाचा तपास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता एटीएस आणि आयबीच्या पथकामार्फत केला जाणार असून एटीएस आणि आयबीच्या पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 


सोमवारी विधानसभेत विरोधकांनी या मुद्द्यावर आवाज उचलत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती दिली. तसेच फॉरेन्सिक विभागाचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी अंतिम निर्णय घेतला जाईल, असे निवेदन त्यांनी दिले होते.  त्या दिशेने आता तपासाचे चक्र गतिमान झाले आहे. 


आतापर्यंत 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू


संरक्षण क्षेत्राला स्फोटके आणि शस्त्रात्रे पुरवणाऱ्या तसेच सुमारे 30 देशांना निर्यात करणाऱ्या सोलर ग्रुपच्या बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या आयुध निर्माणीत रविवारी झालेल्या स्फोटात आतापर्यंत 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या कारखान्यात संरक्षण विभागाकरता लागणाऱ्या विस्फोटकांचे उत्पादन केले जाते. तसेच हा कारखाना पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या अखत्यारीत येतो.


या कारखान्यातील कामगारांची संख्या सुमारे 3400 असून कारखान्यातील कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर 2 या इमारतीत टी. एन.टी. आणि आर. डी.एक्स. या कच्च्या मालाचा वापर करुन हॅन्ड ग्रेनेड बनविण्यासाठी लागणाऱ्या पेलेटसची निर्मिती केली जाते.


नेमकं काय घडलं? 


रविवार 17 डिसेंबरच्या  सकाळी 6 वाजेच्या दरम्यान कारखान्यातील कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर 2 मध्ये नेहमी प्रमाणे काम सुरु करण्यात आले होते. या  ठिकाणी टी.एन.टी. फ्लेक्स चाळणीमध्ये चाळत (Sieving) असताना सकाळी  9 वाजता ही स्फोटाची घटना घडली. त्यामुळे कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर 2 ही इमारत कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण 9 कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ? 


सोलार इंडस्ट्रीज इंडिया मधील स्फोट प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  घटना घडल्यानंतर याठिकाणी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे घटनास्थळी राज्य आपत्ती निवारण दल ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढण्याचे काम करत आहे.  


मृत कामगारांपैकी 8 कामगार हे कामगार राज्य विमा योजनेत नोंदणीकृत असल्याने त्यांना कामगार राज्य विमा योजना कार्यालयाकडून नियमानुसार पेन्शन मिळणार आहे. तसेच उर्वरित एका मृत कामगाराच्या वारसाना नुकसान भरपाई कायदा, 1923 अन्वये नुकसान भरपाई मिळणार आहे. अतिशय दुर्दैवी अशा या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कंपनीकडून सुद्धा 20 लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले