Nagpur News नागपूर : राज्यासह देशभरातील अनेक भागात उष्णतेच्या पाऱ्याने (Temperature) उच्चांक गाठला आहे. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे. तर यंदा देशातील काही भागात उष्णतेच्या पाऱ्याने  (Temperature) विक्रमी तापमान गाठत नवे उच्चांक प्रस्थापित केले आहे. देशाची राजधानी दिल्लीने यंदा 52 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे वाढते तापमान हे साऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. असे असले तरी 30 जून रोजी देशाच्या राजधानीचा ही नोंद राज्याच्या उपराजधानीने मोडीत काढली आहे.


कारण 30 जून रोजी नागपूर शहरात कमाल तापमान चक्क 56 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि अनेकांची भीतीसह चिंताही वाढली. मात्र याबाबत आता स्वत: हवामान खात्याने यावर स्पष्टीकरण देत सेन्सरच्या बिघाडामुळे चुकीचे तापमान नोंदविण्यात आल्याचे म्हटले आहे.


हवामान खात्याने दिले स्पष्टीकरण


गुरुवारी 30 जून रोजी शहरातील रामदासपेठ आणि सोनेगाव केंद्रात अनुक्रमे 56 आणि 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर याबाबतचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाले आणि काही वेळातच ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले. अखेर याबाबत हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने स्पष्टीकरण देत यामागील नेमके काय कारण आहे से स्पष्ट केले आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला. या बाबत नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने एक प्रसिद्धी पत्रक काढून याबाबत खुलासा केला.


यात सांगण्यात आले की, सेन्सरमध्ये बिघाड झाल्यामुळे तापमान चुकीचे आणि जास्त नोंदविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी 30 जून रोजी नागपुरातील तापमान 56 अंश सेल्सिअस नसून ते 45 अंश सेल्सिअस इतके आहे. सध्या घडीला तापमान सेन्सरच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत असून लवकरच ते पूर्ववत होईल, अशी माहिती नागपूर प्रादेशिक केंद्राचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी निवेदन जारी करताना सांगितले आहे. 


भंडाऱ्यात विक्रमी तापमानाची नोंद  


भंडाऱ्यात काल शुक्रवारी विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आलं. शुक्रवारी भंडाऱ्यात 46 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील भंडाऱ्याचं हे  सर्वाधिक उच्चांकी तापमान ठरलं आहे. मागील अडीच वर्षातील भंडाऱ्यातील तापमानाचा हा सर्वाधिक उच्चांक असून प्रखर उष्णतेनं नागरिक आणि वन्यप्राण्यांचेही जीव होरपळून  निघत आहे. मागील आठवड्यापासून भंडाऱ्यात पारा वाढला असून काल उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातामुळं आजारी असलेल्या आठ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. त्यामुळं प्रखर उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी महत्त्वाचं काम असल्यासचं घराबाहेर पडावं, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Vidarbha Weather Update : विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम! पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट, तर काही जिल्ह्यात अवकाळी ढग