मुंबई : सध्या मराठवाड्यासारख्या भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची तर वाणवा आहेच. पण जनावरांनाही चार-पाणी नसल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहोत, असे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. तर राज्य सरकार सध्याच्या परिस्थितीविषयी गंभीर नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. दरम्यान, विरोधी बाकावरील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील दुष्काळसदृश स्थितीवर भाष्य करताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
भीषण दुष्काळ असताना राज्य सरकार गंभीर नाही. नागरिकांना प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. असे असताना हे सरकार टेंडरच्या टक्केवारीत मग्न आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. काँग्रेसने पक्षांतर्गत स्थापन केलेली दुष्काळ समिती ही गावागावात जाऊन दुष्कळाची पाहणी करणार असून सरकारला दुष्काळग्रस्तांना मदत करण्यास भाग पडणार असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
नागपूरमध्ये बैठक, दुष्काळ परिस्थितीवर चर्चा
दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आज काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ पाहणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसच्या नेत्यांची नागपूरमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला नागपूर विभागातील सदस्य माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, रणजित कांबळे, विकास , ठाकरे, अभिजित वंजारी, प्रतिभा धानोरकर, अशोक धोटे, अतुल कोटेजा, सहसराम कोरटे व सुधाकर अडबाले उपस्थित राहणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.
नाना पटोलेंची विरोधकांवर टीका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 31 मे रोजी मराठवाड्यात जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनीदेखील दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. राज्यातील सरकार मूठभर आणि गर्भश्रीमंत लोकांसाठी असून मुख्यमंत्री सुट्टीवर आणि मंत्री विदेशात आहेत. त्यामुळे जनता बेजार आणि सरकार आरामात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली, आपल्या मराठवाड्याच्या दुष्काळ पाहाणी दौऱ्यावर पटोले यांनी जालना जिल्ह्यात जाऊन बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन पिकांची पाहणी केली.
हेही वाचा :
काँग्रेसचे दिग्गज नेते करणार दुष्काळी भागाची पाहणी; विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन
एका बाजुला दुष्काळ तर दुसऱ्या बाजुला पैशाची झळ, लातूरकरांना करावा लागतोय कोट्यावधींचा खर्च