नागपूर : नागपुरातील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील धक्कादायक घटनेत गर्भवती महिलेची प्रसूती रुग्णालयातील वार्डासमोरच्या व्हरांड्यातच झाली. दुर्दैव म्हणजे या असुरक्षित प्रसूतीत महिलेचा बाळ दगावला आहे. महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर प्रसूतीसाठी महिलेला वेळेत वार्डात ( लेबर रूम ) घेतले नाही आणि हलगर्जी केल्याचा आरोप केला आहे. तर रुग्णालयातील वैदकीय अधीक्षकांनी रुग्णालयाची कोणतीही चूक नसून ती महिला रुग्णालयात आली तेव्हाच तिचे बाळ जन्मापूर्वी पोटातच दगावला होते असा दावा केला आहे.. 


नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयातील रविवारी रात्री गर्भवती महिलेची  एक परिचारिका आणि रुग्णालयातील एका सुईणने प्रसूती केली. मात्र, वेदनेने विव्हळणाऱ्या राणी वासनिक नावाच्या या गर्भवती महिलेच्या वेदना काही क्षणातच संपूर्ण आयुष्याच्या वेदनांमध्ये रुपांतर झाले.  रुग्णालयातील परिचारिका बाळाला आत बाळांच्या आयसीयू मध्ये घेऊन  गेल्या. त्याला वाचवण्यासाठी उपचार केले.  मात्र, बाळाच्या अवस्थेत काहीच फरक पडला नाही आणि रुग्णालयातील कर्मचारी बाळाला मृत जाहीर केले.  मात्र, मन हेलावून लावणाऱ्या या सर्व प्रकाराच्या आधी सुमारे एक ते दीड तास रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी वेदनेने विव्हळणाऱ्या राणी यांच्याकडे लक्ष दिले नसल्याचे आरोप होत आहे.. वासनिक कुटुंबियांचा आरोप आहे की स्वतः राणी वासनिक आणि त्यांच्या सोबत असलेल्या कुटुंबाने वारंवार त्यांना लवकर रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती केल्यानंतर ही रुग्णालयात उपस्थित परिचरिकांनी दुर्लक्ष करत "तुम्हाला जास्त कळते की आम्हाला" असे उत्तर दिले होते.


राणी वासनिक या बाळंतपणासाठी त्यांच्या आईकडे नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे गेल्या होत्या. रविवारी रात्री राणी यांना प्रसूतीपूर्व कळा ( वेदना ) येत असताना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना आधी कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेल्या. तिथे त्यांची प्राथमिक चाचणी करत राणी यांची स्थिती पाहता त्यांची प्रसूती अडचणीची होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तिथे दाखल न करून घेता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तिथून त्यांना नागपूर शहरातील डागा शासकीय स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आले. वासनिक कुटुंबियांचा आरोप आहे की रुग्णालयात रात्री आल्यानंतर उपस्थित परिचरिकांनी केलेल्या निष्काळजीमुळेच बाळ दगावला.. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबाने केली आहे.


राणी वासनिक यांची प्रसूती जमिनीवर होत असताना धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आधी मौन बाळगणारे रुग्णालय प्रशासनही आता खळबळून जागा झाला आहे. या घटनेत आमची चूक नाही असा दावा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सीमा पारवेकर यांनी केला आहे. राणी वासनिक यांना जेव्हा डागा रुग्णालयात आणले गेले. तेव्हा त्यांची अवस्था पाहता परिचारिकांनी उपचारासाठी घेतलं, मात्र त्यावेळेस राणी यांची अवस्था लेबर रूम पर्यंत नेऊन प्रसुती करण्याची नव्हती. त्यामुळे परिचारिकांनी प्रसंगावधान ठेवत व्हरांड्यातच जमिनीवर त्यांची प्रसूती केली.


राणी वासनिक यांच्या जुन्या मेडिकल रेकॉर्डप्रमाणे त्यांच्या पोटातली नाळ खालच्या दिशेने असल्यामुळे त्यांची प्रसूती अडचणीची होती. आणि जेव्हा जमिनीवर झालेल्या प्रसूती दरम्यान बाळ बाहेर निघाले तेव्हा तो मृतावस्थेत होता. कदाचित तीन तास पूर्वीच त्याचा गर्भात मृत्यू झाला असावा अशी शक्यता ही डॉक्टर पारवेकर यांनी व्यक्त केली आहे.


 दरम्यान वासनिक कुटुंबीयांनी जमिनीवर झालेल्या प्रसूतीचे व्हिडीओ काढले आणि ते वायरल केले. यामुळे नाराज झालेल्या रुग्णालय प्रशासनाने वासने कुटुंबीयांची पोलिसांकडे तक्रार देत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अद्यापपर्यंत पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केलेला नाही... तर वासनिक कुटुंबाने ही रुग्णालयाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.