नागपूर : तुमच्या नावाने फेसबुकवर सेक्स रॅकेट तर चालवले जात नाहीये ना? हे तपासण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. कारण नागपुरात तीन प्रतिष्ठित लोकांच्या नावाने फेसबुकवर एस्कॉर्ट सर्व्हिसच्या मजकुरासह पेज चालवले जात असल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांच्या मते सध्या गुन्हेगार अशा नव्या युक्त्यांचा वापर करत अनेकांना त्रास देत आहेत. मात्र, मोजकेच लोक हिम्मत करून तक्रार करण्यासाठी समोर येत आहेत.
नागपूरच्या नामांकित कंपनीचा एक अधिकारी, नागपुरातल्या सांस्कृतिक क्षेत्रातला एक कलावंत आणि एक सामाजिक कार्यकर्ता. नागपुरातील या तीन जणांना सध्या वेगळ्याच मनःस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कारण सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून त्यावर एस्कॉर्ट किंवा जिगोलो / कॉलबॉय सर्व्हिसेसमध्ये असलेल्या तरुण-तरुणीचे फोटो टाकून संपर्कासाठी काही नंबर दिले आहे. जर काही आंबट शौकिनांना अशा सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर किती रक्कम मोजायची तो तपशीलही देण्यात आला आहे. शिवाय या क्षेत्रात येऊन झटपट पैसा कमवण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुण तरुणींनी कुठे संपर्क साधावा असेही या मजकुरात नमूद करण्यात आले आहे. फेसबुकवर ज्यांची फ्रेंडलिस्ट लांबलचक आहे किंवा ज्यांची फॉलोविंग चांगली आहे, अशांच्या नावाचा वापर करून असे बनावट फेसबुक आयडी तयार करण्याचा एक नवा पायंडा सायबर गुन्हेगारांनी सुरु केला आहे.
सुरुवातीला लोकांना त्यांच्या नावाने फेसबुकवर अशी एस्कॉर्ट किंवा जिगोलो सेवेची प्रसिद्धी केली जात असल्याचे माहितही होत नाही. मित्र मंडळींकडून समजल्यानंतर बहुतांशी लोक आपला मूळ फेसबुक आयडी डिलीट करून या समस्येशी पिच्छा सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. कारण त्यामुळे त्यांचे मूळ फेसबुक आयडी डिलीट होत असले तरी त्यांच्या नावाचा वापर करून तयार केलेला बनावट एस्कॉर्ट सर्व्हिसचा आयडी कार्यरत राहतो. फार मोजकेच लोक या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करतात. सध्या नागपूर पोलिसांच्या सायबर शाखेकडे अशाच तीन तक्रारी आल्या आहेत.
आतापर्यंत सायबर गुन्हेगारांनी लॉटरी लागल्याची, डेबिट कार्ड बंद झाल्याची किंवा केवायसी अपडेट करणे आवश्यक असल्याची थाप मारून अनेकांची फसवणूक केली. त्यानंतर कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडविले. लॉकडाउनच्या काळात सेक्सटॉर्शनद्वारे अनेकांची बदनामी करण्याची भीती दाखवून खंडणी उकळली आहे. आता मात्र सायबर गुन्हेगारांनी नवा पायंडा घालून समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या फेसबुक आयडीला मिळतीजुळती बनावट आयडी तयार करून त्यावरून सेक्स एस्कॉर्ट सेवेचा नवा मार्ग काढला आहे. त्यामुळे आपण सावध राहणे गरजेचं आहे.