Nitin Gadkari On Maharashtra Politics:  सभागृहाची क्षमता खूप आहे किती ही लोकं आले तरी बसू शकतात... मात्र मंत्रिमंडळाची क्षमता अशी वाढवता येत नाही... वर्तमान राजकीय परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टोला लगावला आहे. राजकारणातील असमाधानी लोकांबद्दल बोलताना आपला देश आणि समाज अतृप्त आत्म्यांचा महासागर असा सूचक वक्तव्य हे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. विद्यापीठ शिक्षण मंचाच्या गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, समाधान हे मानण्यावर असते. आपल्याला आपली क्षमता आणि पात्रतेपेक्षा जास्त मिळाले आहे असे आपण मान्य केले तर समाधान मिळते. नाहीतर आज सर्वच दुःखी आहे. नगरसेवक दु:खी आहे कारण ते आमदार झाले नाही. आमदार दु:खी आहे की ते मंत्री झाले नाहीत. मंत्री यामुळे दु:खी आहे कारण त्यांना चांगलं खातं मिळालं नाही आणि आता जे मंत्री होणार होते ते यामुळे दु:खी आहे की आता त्यांना संधी मिळते की नाही अशी त्यांना शंका आहे.. कारण आता एवढी गर्दी झाली असल्याचे गडकरी यांनी म्हटले.


नितीन गडकरी एवढ्यावरच थांबले नाही तर गेल्या काही दिवसांपासून मंत्री होऊच अशा आविर्भावात फिरणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी भाष्य केले. मागील काही दिवस सर्व तयारच होते.. सूट शिवून, घालतो आणि जातो असा त्यांचा तोरा होता. मात्र, आता त्या सुटाचा काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे. कारण गर्दीच एवढी झाली आहे. या हॉलची क्षमता जास्त आहे, त्यामुळे किती लोकं आले, तरी ते बसू शकतात.. मात्र मंत्रिमंडळाची क्षमता वाढवता येत नाही... त्यामुळे आपला देश आणि समाज दुखी आत्म्यांचा महासागर आहे असे गडकरी मिश्किलपणे म्हणाले.


रविवारी,  राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांची एन्ट्री झाली. अजित पवारांसह 9 मंत्र्यांचा शपथविधीदेखील पार पडला. अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशानंतर शिवसेना-शिंदे गटात नाराजी असल्याचे दिसते.  राज्याचा मंत्रिमंडळ बरेच दिवस रखडला होता. अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. 


राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळेल अशी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना अपेक्षा होती. मात्र, आता शिंदे गटाच्या वाट्याला येणारी मंत्रिपदेदेखील कमी होणार आहेत. त्याच्या परिणामी शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.